Type Here to Get Search Results !

राहुरी - विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. - दखल न घेतल्यास तनपुरे व सय्यद विद्यार्थी व पालकांसह नगरपरिषद समोर आंदोलन छेडणार.


 


विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे.


दखल न घेतल्यास तनपुरे व सय्यद विद्यार्थी व पालकांसह नगरपरिषद समोर आंदोलन छेडणार.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी स्टेशन गावठाण येथे राहुरी नगरपालिकेची शाळा नंबर ५ ही कार्यरत आहे. ही शाळा राहुरी नगरपालिकेची असून हद्द मात्र तांदुळवाडी ग्रामपंचायतची आहे. सध्या या शाळेची दुर्दशा झाली असून त्याकडे पालिकाही लक्ष देत नाही व तांदुळवाडी ग्रामपंचायतही लक्ष घालीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत असल्याची तक्रार शिवसेना नेते अशोकराव एकनाथ तनपुरे व तांदुळवाडी ग्रामपंचायत सदस्य सय्यद निसारभाई यांनी केलेली आहे. 


प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे सांगितले की, गावठाण येथे स्टेशन रोड लगतच पहिली ते सातवी पर्यंतची राहुरी नगरपालिकेची पाच नंबर शाळा आहे. सध्या या शाळेत १५१ विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु शाळेच्या इमारतीसह शाळेची पडवी, स्टेज नादुरुस्त झालेले आहे. शाळेला कंपाउंड नसल्यामुळे बाहेरचे लोक शाळेत प्रवेश करतात. रात्रीच्या वेळी काही महाभाग शाळेच्या पडवीत बसून नशा पाणी करतात. शाळेच्या हद्दीत जनावरे मोकाट फिरतात.


तसेच पावसाळ्यात तर शाळेसमोर पाण्याचे तळेच साचते. या प्रकारामुळे विद्यार्थी व शिक्षकांना देखील जीव मुठीत धरून येथे शिक्षण घ्यावे लागत आहे. परिसरातील सर्व सामान्य व गोरगरीब पालकांची मुले येथे मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतात. 


नगरपालिकेने शाळा परिसरात सुधारणा करावी, शाळेचे कामकाज करावे, विद्यार्थ्यांसाठी संडास व मुतारीची सोय करावी, शाळेला कंपाउंड करावे, तांदूळवाडी ग्रामपंचायतीने  शाळेसमोर मुरूम टाकावा. आदी मागण्या तनपुरे व सय्यद यांनी केल्या असून याची दखल न घेतल्यास राहुरी नगरपालिका कार्यालयासमोर विद्यार्थी व पालकांसह आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.