राहुरीची शिवांजली पतंगे मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची भीती कमी व्हावी, या उद्देशाने शासन मान्यता प्राप्त मंथन फाउंडेशन कडून स्पर्धा परीक्षांचे इयत्ता पहीली पासून आयोजन केले जाते. फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या या परीक्षेत राहुरी येथील शिवांजली जितेंद्र पतंगे या विद्यार्थीनीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
राहुरी नगरपालिकेच्या नूतन मराठी शाळा नंबर दहा, सरोदे वस्ती या शाळेतील इयत्ता १ ली मधील ती विद्यार्थीनी आहे. दि. २९ जून २०२५ रोजी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवांजलीस प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
तसेच या परीक्षेत इयत्ता १ ली च्या दिव्यांका कैलास चिपाडे हिने केंद्रात प्रथम तर इयत्ता २ री च्या स्वरा दत्तात्रय उखारडे हिने केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या शाळेतील एकूण १२ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत सुयश मिळवलेले आहे. या सर्व मुलांना सौ. दिपाली पतंगे व सौ.रेवती एळवंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्वांचे राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी कराड, शाळा व्यवस्थापन समिती व सरोदेवस्ती ग्रामस्थ यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
