राहुरी येथील वारकऱ्यांचा पंढरपूरजवळ अपघात.
दिंडीच्या रथाला पिकअप गाडीची जोराची धडक, ५ वारकरी जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील टाकळीमियाॅ येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या रथाला आज दि. ३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पंढरपूर जवळील भोसे गावा नजीक एका पिकअप गाडीने जोराची धडक दिली. या घटनेत पाच वारकरी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने राहुरी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील श्री दत्त सेवा पायी दिंडी पंढरपूरकडे जात असताना काल रात्री पंढरपूर जवळील भोसे गावात दिंडी मुक्कामी होती. आज दि. ३ जुलै २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास दिंडी पंढरपूरकडे निघाली. तेव्हा भरधाव वेगात आलेल्या एका पिकअप गाडीने करकंब ते पंढरपूर जाणाऱ्या रोडवर दिंडीतील रथाला जोराची धडक दिली.
यावेळी रथ पलटी झाला आणि दिलीप आडगळे, सुभाष चौधरी, सुरेश पाचारणे, भाऊसाहेब शेजूळ, देवराम निकम, सर्व रा. टाकळीमियाॅ, ता. राहुरी, हे पाच वारकरी जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सुभाष चौधरी यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी तात्काळ अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. अपघातग्रस्त वारकऱ्यांना लोकप्रतिनिधी आणि शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी. तसेच या वारकऱ्यांच्या उपचारासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत करावी. असे आवाहन रविंद्र मोरे यांनी केले.