Type Here to Get Search Results !

राहुरी - राहाता तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसाचा दादासाहेब पवार यांची थेट मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री व महसूल मंत्र्याकडे तक्रार.

 राहुरी-राहाता तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसाचा.



दादासाहेब पवार यांची थेट मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री व महसूल मंत्र्याकडे तक्रार.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी व राहाता तालुक्यात मुळा आणि प्रवरा नदीकाठावर बेकायदेशीर वाळू उपसाचा धुमाकूळ पुन्हा एकदा सुरू झाला असून, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी फिरत आहे. यावर कठोर कारवाईची मागणी करत दादासाहेब पवार सामाजिक कार्यकर्ते यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिले आहे.


पवार यांच्या म्हणण्या नुसार, राहुरी तालुक्यात मुळा नदीकाठच्या गावांमध्ये तसेच राहाता तालुक्यातील सोनगाव, सात्रळ, हनुमंतगाव, धानोरे, कोल्हार, चिंचोली या गावांमध्ये तलाठी व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वाळू माफियांनी बेकायदेशीर वाळू उपसा जोरात सुरू केला आहे.


या वाळू उपसामुळे नदीपात्रामध्ये खोल खड्डे निर्माण झाले असून, त्यामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. भविष्यातील पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे शेजारील गावे, शेती, पूल आणि रस्ते यांना भीषण धोका निर्माण होणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.


विशेषतः राहुरी रेल्वे स्टेशनजवळील ब्रिटिशकालीन लोखंडी पुलाखाली आणि पश्चिम बाजूच्या शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालू आहे. शेतकऱ्यांच्या सहमतीने खाजगी रस्ते तयार करून ही वाहतूक खुलेआम सुरू आहे, असे पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.


या सर्व प्रकाराला स्थानिक अधिकाऱ्यांचा पाठीशी असलेला अर्थपूर्ण आशीर्वाद कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, तात्काळ तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून नदीपात्रातील खड्ड्यांचे मोजमाप करून दोषी तलाठी व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची मागणी केली आहे. तसेच वाळू उपसा तात्काळ थांबवून जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.


या पत्राची प्रत जिल्हाधिकारी, तहसीलदार, तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून, या गंभीर प्रश्नावर आता शासन काय पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलं आहे.