Type Here to Get Search Results !

पारनेर | छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे शासनाने ग्रामीण भागातील जनतेस दिलेली अमूल्य भेट” :- सुजित झावरे पाटील यांचे प्रतिपादन

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे शासनाने ग्रामीण भागातील जनतेस दिलेली अमूल्य भेट” :- सुजित झावरे पाटील यांचे प्रतिपादन



पारनेर - प्रतिनिधी :-  महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर वासुंदे येथे मोठ्या उत्साहात पार पडले. टाकळी ढोकेश्वर महसूल मंडळातील वडगाव सावताळ, गाजदीपूर, पोखरी, खडकवाडी, देसवडे, पळशी यांसह परिसरातील अनेक गावांतील मागासवर्गीय, आदिवासी व इतर हजारो नागरिकांनी या शिबिराचा प्रत्यक्ष लाभ घेतला. ग्रामीण भागात सरकारी योजना थेट नागरिकांच्या दारी पोहचल्याने नागरिकांना याचा फायदा होईल व शासकीय कामे झटपट होतील असे सुजित झावरे पाटील यावेळी म्हणाले.




या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, “या शिबिराचे आयोजन हे केवळ सुविधा उपलब्ध करून देणे नसून शासनाने ग्रामीण भागातील जनतेस दिलेली एक अमूल्य भेट आहे. या शिबिरात नागरिकांनी मिळालेला प्रतिसाद पाहता, अशा उपक्रमांची वारंवार गरज भासते.” ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी व विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन वासुंदे येथे करण्यात आले होते. 


उद्घाटन प्रसंगी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की, “ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना आवश्यक दाखले मिळविण्यासाठी पारनेर येथे वारंवार जावे लागते. त्यात वेळ, पैसे आणि त्रासही सहन करावा लागतो. नागरिकांनी यासंदर्भात शिबिर आयोजनाची मागणी केली होती. प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन ही गरज मांडली असता त्यांनी तातडीने शिबिर आयोजित करण्याचे आदेश दिले.”


शिबिरात उपलब्ध सेवा व योजना :

जात, उत्पन्न, डोमीसाईल, शिक्षणासंबंधीचे विविध दाखले

शिधा पत्रिका (रेशन कार्ड) व सुधारणा सेवा

संजय गांधी निराधार योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना

कृषी, महिला व बालकल्याण, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, वन, भूमि अभिलेख विभागाच्या विविध योजना

VJNT प्रमाणपत्र व अ‍ॅग्रीस्टॅक योजनेचा लाभ


♦नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न 


सुजित झावरे पाटील पुढे म्हणाले की, “या भागातील नागरिकांना सरकारी योजना तातडीने मिळाव्यात यासाठी विविध प्रकारचे दाखले आवश्यक असतात व त्यासाठी हे शिबीर शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आले आहे, हे शिबिर या अडचणी सोडविण्याचा एक प्रयत्न आहे.”


या उपक्रमात विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्र येऊन नागरिकांना सेवा पुरवल्या. शिबिराच्या ठिकाणी दस्तऐवज पडताळणी, अर्ज प्रक्रिया, त्वरित प्रमाणपत्र वितरण यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.


♦सामाजिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची पायरी


ग्रामीण व मागास भागातल्या नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांचा थेट लाभ पोहोचवण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले. विशेषतः महिला, विद्यार्थी, शेतकरी, वंचित व आदिवासी घटकांकरिता या शिबिराने दिलासा दिला आहे.


“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित हे समाधान शिबिर म्हणजे जनतेच्या सेवेसाठी शासनाची जबाबदारी आणि आमची बांधिलकी दर्शवणारा उपक्रम आहे,” असेही सुजितझावरे पाटील यांनी सांगितले.


हा उपक्रम इतर गावांमध्येही राबवावा, अशी नागरिकांची मागणी होत आहे. शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन ही काळाची गरज आहे. यापुढील काळात तालुक्यातील विविध भागात अशी लोकोपयोगी शिबीर राबवली जातील असे सुजित झावरे पाटील यांनी यावेळी सांगितले.


यावेळी टाकळी ढोकेश्वर मंडळातील मंडळ अधिकारी जगन्नाथ भालेकर, ग्रामहसुल अधिकारी पांडुरंग कोतकर, प्रदीप भालेकर, निलेश पवार, दत्तात्रय शिंदे, श्री.देशपांडे, ग्रामसेवक सरपंच उपसरपंच चेअरमन व्हा चेअरमन मान्यवर मंडळी लाभार्थी पळशी, खडकवाडी, देसवडे, पोखरी, पवळदरा, नागापूरवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थितीत होते.


♦नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


शिबिरात विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी याचा भरघोस लाभ घेतला. अनेकांनी यापूर्वी कधीच न मिळालेल्या योजनांसाठी अर्ज केले. काहींनी तयार दाखले थेट शिबिरातच स्वीकारले.


या शिबिरामुळे शासनाच्या योजनांचा लाभ खर्‍या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सकारात्मक उपक्रम राबवण्यात आल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली.