सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या पुणे येथील तीन एकर जागेच्या बेकायदेशीर विक्रीवरून चांदवड तालुक्यातील जैन समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. समाजबांधवांनी एकमुखाने संबंधित विश्वस्त मंडळावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
चांदवड शहरात जैन समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या शांततामय मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, अॅड. नरेंद्र कासलीवाल, जवरिलाल संकलेचा, किशोर डुंगरवाल, अशोक कपाडिया यांच्यासह समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या मोर्चादरम्यान उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटलं आहे की, सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची स्थापना १९५४ मध्ये झाली असून, पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात जैन विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू करण्यात आलं होतं. मात्र, ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने धर्मादाय आयुक्तांना चुकीची माहिती देत तब्बल ३११ कोटी रुपयांना गोखले बिल्डर्सकडे तीन एकर जमीन विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
समाजाचे म्हणणे आहे की, ट्रस्टच्या घटनेनुसार अशी विक्री करण्याचा अधिकार विश्वस्त मंडळाला नाही. आर्थिक अडचण असल्यास दान मागण्याचा पर्याय असून, तो न वापरता थेट विक्रीचा मार्ग स्वीकारण्यात आला.
त्याहून गंभीर म्हणजे, उत्कृष्ट स्थितीत असलेल्या इमारतीचे बोगस स्ट्रक्चरल ऑडिट दाखवून ती मोडकळीस आली असे दाखवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
इतकंच नव्हे, तर ६५ वर्षांपूर्वी स्थापन झालेलं १००८ श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर देखील या व्यवहारात गहाण ठेवण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला आहे. यामुळे जैन समाजात तीव्र संताप उसळला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असतानाही, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी विक्रीखत उरकण्यात आलं, आणि विकसकाने बँकांकडून कर्ज घेऊन संपूर्ण संपत्ती गहाण ठेवल्याचं समाजाचं म्हणणं आहे
जैन समाजाने प्रशासनाकडे मागणी केली आहे की —
हा बोगस व्यवहार तात्काळ रद्दबातल करण्यात यावा,
दोषींवर फौजदारी गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी,
आणि संबंधित विभागांनी कोणत्याही प्रकारची पुढील परवानगी देऊ नये.
समाजबांधव एकत्रित, हातात निवेदन, "अहिंसा जिंदाबाद" अशा शांत घोषणांस
जैन समाजाने इशारा दिला आहे की न्याय मिळाला नाही, तर अहिंसेच्या मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल.
सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या या कथित गैरव्यवहारामुळे जैन समाजात प्रचंड संताप आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

