कर्जमाफी जाहीर होईपर्यंत उसाच्या बिलातून कोणतीही कपात नको, शिवसेना शेतकरी सेनची मागणी.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
उसाच्या पेमेंटमधून विविध कर्जाच्या थकबाकी पोटी होणारी कपात तात्काळ थांबवावी, कर्जमाफी जाहीर होईपर्यंत कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, अशा ठाम मागणीचे निवेदन अहमदनगर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर रावसाहेब वर्षे यांना सोमवारी देण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे वसुली संचालक जयवंत देशमुख यांनाही शिष्ट मंडळाने निवेदन देत शेतकऱ्यांची व्यथा मांडली.
यावेळी शेतकरी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देठे, शिवसेनेचे संघटक डॉ. सचिन पवार, शेतकरी सेनेचे पदाधिकारी सतीश पवार, देवळाली प्रवरा शहरप्रमुख जालिंदर मुसमाडे, देवळाली प्रवरा शिवसेना शहर प्रमुख सुनील सीनारे आदी उपस्थित होते.
