दोन महिन्यांपासून नागरिकांना दुषीत पाणिपुरवठा.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील नागरिकांना गत दोन ते तीन महिन्यांपासून अत्यंत दुषित व दुर्गंधीयुक्त प्रदुषित पाणी पिण्याची वेळ आली असून, हा दुषित पाणीपुरवठा ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरठा योजनेतून होत आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात नागरिक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या तक्रारीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे सदस्य राजन ब्राम्हणे यांनी सांगितले आहे.
ग्रामपंचायत सदस्य राजन ब्राह्मणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सोनगाव ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विहिरीतून नागरिकांना केल्या जात असलेल्या पाणी पुरवठ्याच्या नळाद्वारे अतिशय दूषित व दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायत मार्फत केला जात आहे. सदरचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने या दूषित पाण्यामुळे गावात त्वचारोग, पोटदुखी, उलट्या, जुलाब यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.
आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असताना ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा व देखभाल यंत्रणा नेमकी काय करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जनतेला अनेक वेळा खाजगी जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पिण्यासाठी विकतचे पाणी आणण्याची वेळ आली आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य राजन ब्राह्मणे यांनी व नागरिकांनी वेळोवेळी मासिक सभेत यासंदर्भातील समस्या मांडली. तसेच ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तक्रार अर्जाद्वारे शुध्द पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.
मात्र ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. ग्रामपंचायत वेळेत नागरिकांकडून पाणीपट्टी व घरपट्टी सारखे कर वसुल करत असते. मात्र या दूषित पाण्यामुळे लोकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. याची जबाबदारी घेणार आहे का? ग्रामपंचायतची पाणी पुरवठा, देखभाल बरोबरच शुध्द पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असुनही या गोष्टींकडे दुर्लक्ष का केल जात आहे. असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. या संदर्भात तातडीने दखल घेत उपाय योजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा पत्रकात देण्यात आला.
