राहुरी नगरपालिकेत समित्यांच्या निवडी खेळीमेळीच्या वातावरणात.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी नगरपालिकेच्या स्थायी समिती, शिक्षण समिती व महिला-बालकल्याण समितीच्या निवडी सोमवार दि. १९ रोजी शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. तहसीलदार अमित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत तिन्ही समित्यांच्या निवडी बिनविरोध पूर्ण करण्यात आल्या.
स्थायी समितीत नगराध्यक्ष भाऊसाहेब छबुराव मोरे हे पदसिद्ध सदस्य असणार आहेत. स्थायी समितीच्या सदस्यपदी हर्ष अरुण तनपुरे, प्रशांत विजय डौले, सोन्याबापू जगधने, प्रदीप भुजाडी व सिंधू डावखर यांची निवड करण्यात आली.
शिक्षण समितीच्या सभापतीपदी गजानन भागवत सातभाई यांची निवड झाली. त्यांच्या सोबत सदस्य म्हणून केतन पोपळघट, प्रतीक तनपुरे, बबन गुलदगड व प्रसन्ना वराळे यांची निवड करण्यात आली.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी स्मिता भारत भुजाडी यांची निवड करण्यात आली. समितीच्या सदस्यपदी संगीता जाधव, वृषाली तनपुरे, आस्मा शेख, प्रियंका काशीद व मनीषा भोंगळ यांची निवड झाली.
या बैठकीस मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व सदस्यांचा ज्येष्ठ नगरसेविका डॉ. ऊषाताई तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नगरपालिकेच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी सर्व समित्यांनी समन्वयाने कार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या निवडीमुळे नगरपालिकेच्या कामकाजाला नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
