साक्षीदाराकडून भर न्यायालयात वकिलास शिवीगाळ.
राहुरी वकील संघटनेकडून जाहीर निषेध, पोलिस प्रशासनाला निवेदन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी न्यायालयात सुरू असलेल्या एका प्रकरणातील साक्षीदाराने श्रीरामपूर बार असोसिएशनचे वकील अँड. सतिश डोंगरे यांना शिवीगाळ केल्याची गंभीर घटना दि. १८ जानेवारी रोजी घडली. या प्रकारामुळे न्यायालयीन कामकाजात व्यत्यय निर्माण झाला असून वकील संघटनेने दुपार नंतर कामबंद आंदोलन करून तीव्र संताप व्यक्त केला.
अँड. सतिश डोंगरे हे राहुरी न्यायालयात नियमित कामकाज करत असतात. संबंधित प्रकरणातील साक्षीदाराने नियंत्रण सुटल्याने वकिलांवर अपमानास्पद शब्दांचा वापर केला. ही घटना न्यायालयाच्या सन्मानाला धक्का देणारी असून कायद्याच्या राज्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे मत वकिलांकडून व्यक्त करण्यात आले.
या घटनेचा राहुरी व श्रीरामपूर बार असोसिएशनने जाहीर निषेध केला आहे. या घटनेमुळे न्यायालयात काम करणाऱ्या वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित साक्षीदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वकील संघटनांकडून करण्यात आली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेण्यात यावी तसेच न्यायालयीन शिस्त आणि प्रतिष्ठा अबाधीत राखण्यासाठी भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने ठोस उपाय योजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदर व्यक्तीने माफीनामा दिला. मात्र वकील संघटनेने तो फेटाळला. न्यायालयाने स्वतः संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने वकील संघटनेने आंदोलन मागे घेतले. सदरची व्यक्ती ही देवळाली प्रवरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
