डॉ. संजय खेडेकर यांना वैद्य खडीवाले पुरस्कार.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
महाराष्ट्रातील आयुर्वेद व रसशास्त्र विषयातील अत्यंत मानाचा समजला जाणारा 'वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था' व 'महर्षी आण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार समिती' यांचेतर्फे यावर्षीचा "वैद्य द. वा. शेंड्ये रसौषधी पुरस्कार" यावर्षी मूळचे राहुरी येथील डॉ. संजय भाऊसाहेब खेडेकर यांना महाराष्ट्रातील ज्येष्ठ रंगकर्मी "श्री. प्रशांतजी दामले' यांच्या हस्ते पुणे येथील टिळक स्मारक मंदिर येथे आयुर्वेद क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
मागील ४० वर्षांपासून नियमितपणे देण्यात येणारा हा पुरस्कार असून रु. एकवीस हजार रोख, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. संजय हे आयुर्वेदातील रसशास्त्र या अत्यंत महत्वाच्या शाखेतील एक प्रख्यात संशोधक, शिक्षक व अभ्यासू चिकित्सा तज्ञ असून त्यांनी आयुर्वेदीय औषधनिर्मिती, धातु-खनिज प्रक्रिया,भस्म सिद्धी तसेच आयुर्वेद औषधांच्या गुणवत्ता विषयक शास्त्रीय निकषांवर सखोल कार्य केलेले आहे.
रसशास्त्र विषयातील तात्विक तसेच व्यावहारिक ज्ञान देशभरातील आयुर्वेद विद्यार्थ्यां पर्यंत पोचविण्यात डॉ. खेडेकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. आयुर्वेदाची वैज्ञानिक विश्वासार्हता वाढविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. सुवर्णभस्म व त्यापासून निर्माण होणाऱ्या औषधांपासून मधुमेह, कर्करोग तसेच कोरोना काळातील म्युकर मायकोसिस च्या अनेक रुग्णांना डॉ. खेडेकर यांच्यामुळे नवीन जीवन लाभले आहे.
डॉ. खेडेकर यांना यापूर्वी 'आंतरराष्ट्रीय ग्रँट अवॉर्ड', भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 'उत्कृष्ट संशोधक पुरस्कार', तसेच "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेन्द्रजी फडणवीस" यांच्या हस्ते 'राष्ट्रीय रसाचार्य' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. संजय खेडेकर हे सध्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा येथे रसशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. येथील एकात्मिक ऑन्कॉलॉजी रिसर्च व केअर सेंटरचे कन्व्हेनर आहेत. हे भारतातील पहिले असे केंद्र आहे, जे आयुर्वेद, योग, पंचकर्म, आहार चिकित्सा व आधुनिक ऑन्कॉलॉजीला एकत्र करून कर्करोग रुग्णांसाठी समग्र पुनर्वसन व उपचार पुरवते.
डॉ. खेडेकर हे राहुरी येथील श्री. भाऊसाहेब खेडेकर यांचे चिरंजीव असुन आयुर्वेद तज्ञ डॉ. किशोर खेडेकर यांचे ज्येष्ठ बंधु आहेत. या सन्माना बद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या.
