समाविष्ट गावांच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी; जाचक करप्रश्नावर नगरसेवक सुभाष नाणेकर आक्रमक
पुणे प्रतिनिधी (अमोल उदमले):पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासासाठी स्वतंत्र व विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा या भागांचा अपेक्षित विकास होणार नाही, अशी ठाम मागणी नगरसेवक सुभाष नाणेकर यांनी केली.
महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेमध्ये त्यांनी समाविष्ट गावांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला.
समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सुविधा अद्याप अपुऱ्या आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्ट्रीटलाइट्स, आरोग्य व स्वच्छता यांसारख्या आवश्यक सुविधांचा अभाव जाणवत असताना नागरिकांकडून मात्र शहराप्रमाणे कर आकारले जात असल्याचे नाणेकर यांनी निदर्शनास आणले. विकासकामे न होता केवळ करांचा बोजा टाकणे अन्यायकारक असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
“समाविष्ट गावांना शहरात घेतले, पण सुविधा मात्र दिल्या नाहीत. नागरिकांकडून जाचक कर वसूल केले जात आहेत. या भागांसाठी स्वतंत्र विकासनिधी दिल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही,” असे स्पष्ट मत सुभाष नाणेकर यांनी व्यक्त केले.
समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नियोजनबद्ध निधी, स्वतंत्र आराखडा आणि प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे..
यावर महापौर मंजुषा नागपूरे यांनी प्रशासनाला यासंबंधी बैठक घेण्याचे आदेश दिले...
