Type Here to Get Search Results !

राहुरी - नूतन मराठी शाळा नं. ९ येवले वस्ती येथे विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला.


 


विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला.


विद्यार्थ्यांना लहानपणा पासूनच व्यवहार ज्ञान व आर्थिक साक्षरतेचे धडे देणे आवश्यक- भाऊसाहेब मोरे, नगराध्यक्ष.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


शिकता शिकता कमवा, अनुभवातून घडवा या अभिनव संकल्पनेतून नूतन मराठी शाळा नं. ९ येवले वस्ती येथे बुधवार दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. शाळेचा परिसर रंगीबेरंगी सजावटीने नटला होता. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांनी आकर्षक फलक, दरपत्रक व कल्पक सजावट करून खऱ्या अर्थाने बाजारपेठेचा अनुभव निर्माण केला.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीमाईंच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर यावेळी अध्यक्षस्थानी दत्तात्रय येवले हे होते.


प्रास्ताविकात मुख्याध्यापकांनी या उपक्रमा मागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, शिक्षणा सोबत व्यवहार ज्ञान, आर्थिक साक्षरता व आत्मनिर्भरतेचे धडे विद्यार्थ्यांना देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी ताज्या भाजीपाल्याचे स्टॉल लावले होते. टोमॅटो, बटाटे, कांदे, भेंडी, कोबी, मेथी, पालक, शेवगा आदी भाज्या विक्रीसाठी मांडण्यात आल्या होत्या. 


तसेच खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर अंकुरित कडधान्ये, घरगुती लाडू, चिवडा, पोहे, लिंबूपाणी, शिरा, उपमा असे विविध चविष्ट पदार्थ उपलब्ध होते. विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी नम्रतेने संवाद साधत वस्तूंची माहिती दिली. दर ठरविणे, वजन करणे, पैसे घेणे-देणे, सुट्टे पैसे देणे तसेच नफा-तोट्याची गणना करणे या सर्व बाबी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने हाताळल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना गणितातील बेरीज-वजाबाकी, नफा-तोटा आणि मोजमाप यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्याचबरोबर संवाद कौशल्य, नियोजन, जबाबदारी आणि संघभावना यांचाही विकास झाला.


मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेविका प्रियंका आहेर, नगरसेवक डॉ. संतोष उदावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पवार, पत्रकार आकाश येवले, लक्ष्मण म्हसे, राऊसाहे येवले, राजेंद्र येवले, हृषीकेश येवले, अक्षय येवले, निलेश जगधणे, आरिफ शेख, संजय कोकाटे, संजय वराळे, महेश वराळे, तसेच न. पा. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट दिली व खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले. शाळेचा परिसर खऱ्या बाजारपेठेप्रमाणे गजबजून गेला होता. या बाल आनंद मेळाव्यात सुमारे 26,000 ची उलाढाल झाली.


यावेळी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मनोज पालवे, मनीषा गिरी, सविता झावरे, अश्विनी भुजबळ, वर्ष बोरुडे, मल्हारी भवर आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे म्हणाले कि, विद्यार्थ्यांना लहानपणा पासूनच व्यवहार ज्ञान व आर्थिक साक्षरतेचे धडे देणे अत्यंत आवश्यक आहे. नूतन मराठी शाळेचा हा उपक्रम स्तुत्य असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि स्वावलंबनाची भावना बळकट होते. शिक्षण अधिक जीवनोपयोगी बनविण्याचा हा प्रभावी मार्ग आहे.