Type Here to Get Search Results !

राहुरी - तडीपार असलेले आरोपी पून्हा तडीपार - राहुरी पोलिसांची कारवाई, आरोपींना गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.


 


तडीपार असलेले आरोपी पून्हा तडीपार.


राहुरी पोलिसांची कारवाई, आरोपींना गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीला राहुरी पोलिस पथकाने वांबोरी परिसरातून ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी करण्यात आली.


हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडील आदेशानुसार आरोपी संदीप दिलीप चेडवाल आणि सोन्या ऊर्फ प्रसाद बाबासाहेब चेंडवाल (दोघेही रा. गुंजाळे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांना दिनांक १८ डिसेंबर २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्यात आले होते.


दरम्यान सदर आरोपी वांबोरी हद्दीत येणार असल्याची गोपनीय माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी तात्काळ पोलीस पथकाला सूचना देऊन वांबोरी परिसरात शोध मोहीम राबवली. शोधा दरम्यान दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी आरोपी वांबोरी येथे आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.


यानंतर आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गु. र. नं. १२८/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपीला गंगापूर पोलीस स्टेशन, जि. छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उप विभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.