विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन
कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन ढसाळांच्या जयंतीदिनी रविवार दि.१५/०२/२०२६ रोजी नीलकमल लाॅन्स, पुणे-नाशिक रोड, राजगुरुनगर येथे संपन्न होणार आहे अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे दिली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस हे उद्घाटक असून,कनेरसर गावचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, महा.राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य कांताराम सोनवणे हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक म.भा.चव्हाण हे परिसंवादप्रमुख असून कविसंमेलनाचे अध्यक्ष मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अनंत धनसरे आहेत.
ज्येष्ठ विधिज्ञ व साहित्यिक प्रकाश शितोळे हे स्वागताध्यक्ष आहेत तसेच केंद्रीय रस्तेविकास व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी साहित्य संमेलनासाठी शुभसंदेश दिला असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,परिसंवाद,
काव्यसंमेलन,गुणवंतांचा सन्मान याचे आयोजन केले आहे.
कनेरसर येथे दि.१५/०२/२०२४ रोजी पहिले व यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे दि.१५/०२/२०२५ रोजी दुसरे साहित्य संमेलन झाले होते.पुर ता.खेड येथे नामदेवराव ढसाळ यांचा जन्म झाला असून कनेरसर येथे शालेय शिक्षण झाले होते.ढसाळ हे मुंबई येथे उपजिवीकेसाठी गेले व तीच त्यांची कर्मभूमी ठरली.साहित्य क्षेत्रात तसेच दलित पँथर च्या माध्यमातून त्यांनी अलौकिक योगदान दिले आहे.विश्वसाहित्यिक म्हणून त्यांची गणना होते.
भारत सरकारने नामदेवराव ढसाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता.विद्रोही कवी- लेखक म्हणून ढसाळांची गणना होते.गोलपिठा या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला राज्य शासनासह अनेक पुरस्कार मिळाले होते.हाडकी हाडवळा,मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे,गांडु बगीचा,तुही यत्ता कंची? मुर्ख म्हातार्याने डोंगर हलविले ? या सत्तेत जीव रमत नाही,प्रियदर्शनी,खेळ व इतर विपुल साहित्य संपदा ढसाळांनी निर्माण केली आहे.खेड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,साहित्यिक,साहित्य प्रेमी यांनी ढसाळांचा वारसा जतन करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन टाव्हरे यांनी केले आहे.
प्रतिनिधी सुनिल पिंगळे शिक्रापूर
