कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनीत क्रीडा सुविधांना बळ; तिसऱ्या टेनिस कोर्टचे भूमिपूजन,बास्केट बॉल कोर्ट कामालाही सुरुवात
पुणे प्रतिनिधी (अमोल उदमले): कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनी परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून प्रभाग क्रमांक ३० मध्ये क्रीडा सुविधांना मोठे बळ मिळाले आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या टेनिस कोर्टांच्या मालिकेत तिसऱ्या टेनिस कोर्टच्या उभारणीचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी २०२६) पार पडला. हा सोहळा माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याचबरोबर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलातील बास्केट बॉल मैदानाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामालाही अधिकृत सुरुवात करण्यात आली. सदर मैदानाची अवस्था अतिशय खराब झाल्याने खेळाडूंना दुखापतीचा धोका वाढला होता. गेल्या आठ वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या या मैदानाची डागडुजी होणे काळाची गरज बनली होती.
या कामासाठी नगरसेवक स्वप्नील देवराम दुधाने यांनी सातत्याने पाठपुरावा करत पुणे महानगरपालिकेकडून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. टेनिस कोर्टच्या सोबतीने बास्केट बॉल कोर्टचे काम सुरू झाल्याने परिसरातील खेळाडूंमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
येत्या दोन महिन्यांत अत्याधुनिक दर्जाचे सिंथेटिक टेनिस कोर्ट व सुरक्षित बास्केट बॉल कोर्ट तयार होणार असून यामुळे प्रभागातील तसेच शहरातील खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, सहकारी, खेळाडू आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या विकासकामाचे भरभरून कौतुक केले.
क्रीडा सुविधा वाढवून युवकांना सकारात्मक दिशेने प्रोत्साहित करण्याचा मानस असून भविष्यातही अशा अनेक वैविध्यपूर्ण विकासात्मक उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती नगरसेवक स्वप्नील देवराम दुधाने यांनी दिली.



