Type Here to Get Search Results !

पारनेर - टाकळी ढोकेश्वर येथे बनाई देवी यात्रा उत्सव २१ ते २४ मार्च दरम्यान साजरा होणार

 टाकळी ढोकेश्वर येथे बनाई देवी यात्रा उत्सव २१ ते २४ मार्च दरम्यान साजरा होणार.



यात्रेनिमित्त नामवंत निकाली कुस्त्यांचे आयोजन आकर्षक बक्षिसे.


पारनेर/प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर हे गाव जागृत ग्रामदैवत माता बनाई देवीच्या श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पंचक्रोशीतील सर्व धर्मीय भाविकांसाठी हे ठिकाण विशेष महत्त्वाचे आहे. येथील बनाई देवी यात्रा उत्सव यंदा उत्साहपूर्ण व भव्य स्वरूपात साजरा होणार असून, यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यात्रा २१ ते २४ मार्च २०२६ या कालावधीत होत असून, गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवसापासून हा उत्सव सुरू होईल.

श्री बनाई देवी सार्वजनिक यात्रा उत्सव कमिटीच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे भव्य निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा. या कुस्त्यांसाठी ४० नामवंत पैलवानांची जोड्या जाहीर करण्यात आल्या असून, आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये पैलवान महेश फुलमाळी विरुद्ध पैलवान आकाश चव्हाण (३१ हजार रुपये), पैलवान अंकित धुळगंड विरुद्ध पैलवान ऋत्विक बिन्नर (२५ हजार रुपये), पैलवान रोहन परदेशी विरुद्ध पैलवान गोवर्धन शिंदे (२१ हजार रुपये), पैलवान अवि साळवे विरुद्ध पैलवान रामा सुरडकर (२१ हजार रुपये), पैलवान सार्थक वाळुंज विरुद्ध पैलवान कुमार देशमाने (१५ हजार रुपये), पैलवान अतुल नाईकल विरुद्ध पैलवान गणेश फडके (११ हजार रुपये), पैलवान दिनकर पवार विरुद्ध पैलवान भाऊसाहेब वरे (११ हजार रुपये), पैलवान सौरभ मराठी विरुद्ध पैलवान पवन डोनर (१० हजार रुपये) अशा प्रमुख लढती होणार आहेत.

विजेत्या पैलवानांना यात्रा कमिटीचे अध्यक्ष पै. संपत शेठ तराळ व उपसरपंच रामभाऊ तराळ यांच्यावतीने आकर्षक चषक, तसेच मराठा महासंघ पारनेर तालुका अध्यक्ष विक्रम शेठ झावरे व बबलू शेठ जयसिंग झावरे पाटील यांच्याकडून मानाची गदा बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. ही कुस्ती सोमवार, २३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता आयोजित आहे.

यात्रेचे इतर प्रमुख कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत:

शनिवार, २१ मार्च २०२६ – सायंकाळी ८ वाजता हजरत शादवल शाह र.ह. / फकिरबाबा संदलचा कार्यक्रम.

रविवार, २२ मार्च – सकाळी ८ वाजता बनाईदेवी काठी मिरवणूक, रात्री ८ वाजता छबीना मिरवणूक, रात्री १० वाजता लोकनाट्य तमाशा.

सोमवार, २३ मार्च – सकाळी ८ वाजता मळगंगादेवी काठी मिरवणूक, दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा, रात्री ८ वाजता छबीना, रात्री १० वाजता ऑर्केस्ट्रा.

मंगळवार, २४ मार्च – सकाळी ८ वाजता मुक्ताईदेवी काठी मिरवणूक, रात्री ८ वाजता मुक्ताईदेवी छबीना, रात्री १० वाजता ऑर्केस्ट्रा.

तसेच २४ व २५ मार्च रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बैलगाड्यांच्या भव्य शर्यती आयोजित आहेत. संपूर्ण यात्रेदरम्यान फटाके व दारुगोळ्याची भव्य आतीशबाजी पाहायला मिळेल.

हा उत्सव सर्वधर्मीयांच्या एकतेचे प्रतीक आहे. हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून, यात्रा कमिटीचे अध्यक्ष संपतराव तराळ, उपाध्यक्ष संजय खिलारी (मेजर), बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाळशिरम पायमोडे, विक्रमशेठ झावरे, अंकुशशेठ पायमोडे, मळीभाऊ रांधवन, विकास आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली तयारी जोमाने सुरू आहे.

सर्व भाविक, पैलवान प्रेमी व नागरिकांनी या भव्य यात्रेत सहभागी होऊन उत्सव यशस्वी करण्याचे आवाहन कमिटीने केले आहे. टाकळी ढोकेश्वरची ही यात्रा धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक वैभव व सामाजिक एकतेचा उत्सव म्हणून स्थानिक स्तरावर विशेष ओळखली जाते.