रेल्वे मार्गात जमिन जात असल्याने मिराबाई हापसे यांचा विरोध.
कोट्यावधींची जमीन कवडीमोल भावाने देणार नाही- मिराबाई हापसे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी ते शनि शिंगणापूर या रेल्वे मार्गात जमिन जात असल्याने राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील श्रीमती मिराबाई सिताराम हापसे यांनी विरोध केला असून त्यांनी श्रीरामपूर येथील उप विभागीय अधिकारी यांना निवेदन पाठवले आहे.
त्या निवेदनात म्हटले आहे कि, श्रीमती मिराबाई सिताराम हापसे ह्या राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील रहिवाशी असून त्यांची ब्राम्हणी गावात गट नं. ४०७/२ मधील जमीन असून सदरच्या क्षेत्रावर त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. त्या क्षेत्रातून राहुरी शनि शिंगणापूर रेल्वेमार्ग सुरु होणार असल्याचे प्रशासनाने वर्तमान पत्रामध्ये दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहिरात देऊन कळविले आहे.
सदर रेल्वेमार्ग मिराबाई हापसे यांच्या क्षेत्रातून गेल्यास त्यांचे खूप मोठे अपरिमित नुकसान होणार आहे. कारण सदर रेल्वे मार्ग हा हापसे यांच्या क्षेत्राच्या मधून जात असल्याने सदर क्षेत्र विभागले जाणार आहे. तसेच त्या क्षेत्राला रेल्वे मार्ग गेल्या नंतर कुठलाही प्रकारचा रस्ता दळणवळण करण्या करिता राहणार नाही.
सध्या त्या क्षेत्रामध्ये ऊस व गहू हे पिके आहेत. मिराबाई हापसे यांना त्या क्षेत्रा शिवाय दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन नाही किंवा दुसरीकडे कुठेही क्षेत्र नाही. सदर जमिनी मध्ये त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे.
सदर जमिनीचा विचार करता आजच्या स्तिथीनुसार किंवा बाजार भावानुसार मिराबाई हापसे यांच्या जमिनीची किंमत कोट्यावधीच्या आसपास असून या रेल्वे मार्गाने सदर जमीन प्रशासन कवडीमोल बाजार भावाने अधिग्रहित करणार आहेत, ते मिराबाई हापसे यांना मान्य नाही.
तरी सदर क्षेत्रामधून रेल्वे मार्ग नेण्यास श्रीमती मिराबाई सिताराम हापसे यांचा तीव्र विरोध व हरकत आहे. तरी त्या क्षेत्रामधून उपरोक्त रेल्वेमार्ग काढू नये, मिराबाई हापसे यांनी मागणी केली आहे.
