लोकप्रतिनिधींनी कायद्याचे सखोल ज्ञान आत्मसात केल्यास जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतील - नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे
नगरपालिकेच्या बजेट व नियोजनासंदर्भात संगमनेर नगरपालिका आणि प्रजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा संपन्न
संगमनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या उपस्थितीत संगमनेर नगरपरिषद व प्रजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली विशेष कार्यशाळा बैठक आज पार पडली.
या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक प्रभावी, जबाबदार आणि कायदेशीर चौकटीत कसे राबवता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ या कायद्याचा अभ्यास, नगरसेवकांची भूमिका, विविध विषय समित्यांचे महत्त्व तसेच सभागृहातील कामकाजाची पद्धत यावर प्रजा फाउंडेशन मधील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींनी कायद्याचे सखोल ज्ञान आत्मसात केल्यास जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतात आणि प्रशासन अधिक पारदर्शक होते. बजेट संदर्भातील सूक्ष्म नियोजन, निधीचा कार्यक्षम वापर आणि विकासकामांमध्ये जनसहभाग वाढविणे यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहेत.
संगमनेरचे सर्व नगराध्यक्ष सहभागी -
जनतेचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडण्याची पद्धत, प्रश्न विचारण्याचे कौशल्य आणि कायद्याचा अचूक अर्थ लावण्याबाबत सहभागी नगरसेवकांना व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेमुळे आगामी काळात संगमनेर शहरातील विकासकामे अधिक परिणामकारक आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यास चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



