वासुंदे ठाकरवाडीत आदिवासी बांधवांना मोफत स्प्रे पंपांचे वाटप; खासदार निलेश लंकेंचे विशेष सहकार्य
सचिव अमोल उगले यांच्या प्रयत्नांना यश; दुर्गम भागातील शेतकऱ्यांची शेती आता होणार अधिक सोपी
पारनेर/प्रतिनिधी :
समाजातील वंचित आणि कष्टकरी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. याच भावनेतून, जिल्हा समाजकल्याण विभागाच्या २०% सेज (Cess) निधीअंतर्गत मागासवर्गीय व आदिवासी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ पारनेर तालुक्यातील वासुंदे ठाकरवाडी येथील शेतकऱ्यांना मिळवून देण्यात आला.
लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव अमोल उगले यांच्या पाठपुराव्यामुळे वासुंदे ठाकरवाडी येथील आदिवासी बांधवांना नुकतेच पेट्रोल फवारणी पंपांचे (स्प्रे पंप) मोफत वाटप करण्यात आले.
पंचायत समिती पारनेर यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेचा लाभ हेमंत मधे, ठकाजी चिकने, भाऊसाहेब केदार, संतोष केदार आणि नवनाथ केदार या गरजू आदिवासी शेतकऱ्यांना मिळाला. शेतीमध्ये कीडनियंत्रण करण्यासाठी आणि मजुरीचा खर्च वाचवण्यासाठी हे पेट्रोल पंप या शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान ठरणार आहेत.
या वाटप प्रसंगी युवा नेते अमोल उगले व डॉ. बाबासाहेब गांगड यांच्यासह विविध मान्यवर आणि लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
प्रशासकीय स्तरावर पंचायत समितीनेही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने, ही योजना यशस्वीपणे पूर्णत्वास गेली आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शेतीला बळ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
