वांबोरी फाटा येथील जप्त डेअरीत चोरी, मोटारीचा भाग व कॉपर तार लंपास.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तालुक्यातील वांबोरी फाटा (धामोरी बु.) येथील जप्त करण्यात आलेल्या कुलस्वामिनी दुध डेअरीमध्ये अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून प्रवेश करत मोटारीचा भाग व कॉपर तार चोरून नेल्याची घटना १२ मार्च रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रदीपकुमार ओमप्रकाश श्रीवास्तव (वय ५५), चीफ मॅनेजर, बँक ऑफ बडोदा, छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार सन २०२२ मध्ये वांबोरी फाटा (धामोरी बु.) येथील कुलस्वामिनी दुध डेअरी जप्त करण्यात आली होती. त्यावेळी पंचासमक्ष मालमत्तेला सील करण्यात आले होते तसेच सुरक्षेसाठी बापुसाहेब अर्जुन थोरात (रा. बाभळगाव, ता. राहुरी) व ऋषिकेश गोरक्षनाथ आडसुरे (रा. वरवंडी, ता. राहुरी) यांची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
१२ मार्च रोजी सकाळी सुमारे ७ वाजता बँकेचे अधिकारी अनिल वसुदेव लव्हारे यांनी श्रीवास्तव यांना फोन करून डेअरीमध्ये चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर दोघेही घटनास्थळी गेले असता सुरक्षा रक्षक ऋषिकेश आडसुरे यांनी पहाटे सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास पहारा देताना डेअरीच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी डायल ११२ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली होती.
घटनास्थळी पाहणी केली असता डेअरीतील मिल्क पंप मोटारीचे नुकसान करून तिचा अर्धा भाग उघडून त्यामधील सुमारे १० किलो वजनाची कॉपर तार व मोटारीचा काही भाग चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळून आले. तसेच शेजारी असलेल्या लुबी कंपनीच्या बेल्ट मोटारीला जाळून नुकसान केल्याचेही निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या मोटारीचा भाग व कॉपर तार यांची किंमत अंदाजे १५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
