Type Here to Get Search Results !

राहुरी - डॉ. गोविंद गारे यांच्या स्वतःच्या खर्चाने वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु

 डॉ. गोविंद गारे यांच्या स्वतःच्या खर्चाने वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु.



वायळ यांचे कार्य समाजापुढे आदर्शवत ठरले- पोलीस निरीक्षक संजय ठेंगे. 


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील कोळेवाडी सारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील गोर गरिबांची मुले नोकरीला लागावीत व स्वतःच्या पायावर उभी राहावीत. म्हणून राहुरी कृषी विद्यापीठातील किटक शास्त्रज्ञ डाॅ. चांगदेव वायळ यांनी कोळेवाडी येथे स्वतःच्या खर्चाने डॉ. गोविंद गारे वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केले. 


या वाचनालयात वेगवेगळ्या पदांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी लागणारी पुस्तके व मासिके उपलब्ध करुन दिलेली आहेत. ग्रामीण भागातील हुशार व गोरगरिबांच्या मुलांसाठी वायळ यांची नेहमी मदत व मार्गदर्शनाचे कार्य समाजापुढे आदर्शवत ठरले असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले.


कोळेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेेत दहावीत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच प्रकल्प स्तरावर विविध खेळात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. ठेंगे म्हणाले एकदा का सरकारी नोकरी लागली की प्रत्येकजण फक्त स्वतःच्याच कुटुंबाचा आणि मुलांचा विचार करतात. पण याच गावचे रहिवासी आणि राहुुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे वरिष्ठ कीटक शास्रज्ञ या पदावर कार्यरत असलेले प्रा. डॉ. चांगदेव वायळ मात्र याला अपवाद ठरले आहेत.


पाणी फॉउंडेशनच्या माध्यमातून डाॅ चांगदेव वायळ हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांवरील किडींचे वेळीच नियंत्रण करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न वाढण्यासाठी योगदान देत आहेत.


डाॅ. चांगदेव वायळ म्हणाले की आदिवासी समाज हा सुधारलेल्या समाजाच्या मुख्य प्रवाहा पासून अलिप्त डोंगर- दऱ्यात राहत असल्यामुळे शिक्षण व सुधारणापासून कोसो दूर लांब आहे. या समाजातील मुलांना शिकायचे असेल तर शासकीय आदिवासी आश्रम शाळांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी म्हणून डॉ. गोविंद गारे वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र, कोळेवाडीच्या वतीने विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रशतीपत्र व दहावीत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला  बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे.


यावेळी प्रगतशील महिला शेतकरी, निर्मलाताई गाढे व मुळानगर- वरवंडीचे माजी सरपंच अंकुशराव बर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास रावसाहेब कांबळे, जयराम नंदकर, दत्तात्रय आंबेकर, आदिवासी आश्रम शाळेचे मुख्यध्यापक राम मळेकर, पञकार राजेंद्र वाडेकर, पोपट आंबेकर, बाळासाहेब गागरे, दत्ता लेंभे, शशिकांत हांडे, पुंजाजी मुसळे, नामदेव लोहकरे, भूषण कोरडे, प्रविण कोकाटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर पुंड तर आभार चंद्रहास जाधव यांनी मानले.