बंद घरातील लाखों रुपयांचे दागीने व गृहोपयोगी सामान चोरी.
४ लाख ३९ हजार रुपए किंमतीचा मुद्देमाल गायब, चार जणांवर गुन्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरातील शनिचौक परिसरात एका बंद असलेल्या घरातील लाखों रुपए किंमतीचे सोन्याचे दागीने व गृहोपयोगी सामान चोरुन नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात ४ जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अच्युत रघुनाथ पोपळघट, वय ६४ वर्षे, रा. शनीचौक, राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, अच्युत पोपळघट व त्यांच्या शेजारी राहणारे सदानंद घनश्याम पोपळघट यांच्यात नेहमी जागेवरुन वाद होत असत. त्यामुळे अच्युत पोपळघट यांनी त्या जागे संदर्भात कोर्टात केस दिलेली आहे.
अच्युत पोपळघट यांनी तनपुरेवाडी रोड येथे नवीन घेतलेल्या जागेमध्ये बांधकाम करावयाचे असल्याने ते नवीन बांधकामा शेजारी शेडमध्ये सहा महिन्या पासुन तात्पुरत्या वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे शनी चौका जवळील राहते घर बंद होते. त्या घरामध्ये घरातील वापराच्या सर्व वस्तु होत्या.
दि. ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राहुरी कोर्टाकडील क्रिमिनल केस नं. १८/२०२४ चे आदेशान्वये राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विजय नवले यांनी अच्युत पोपळघट यांना चौकशी कामी शनी चौकातील त्यांच्या जुन्या घरी बोलाविले. त्यावेळी अच्युत पोपळघट हे जुन्या घरी गेले.
त्यांनी घर उघडुन घराची पाहणी केली असता त्यांचे घराचे समोरील कॉलिस गाडी नं. एम.एच. १७ के. ३७९ हिचे काच, बोनेट, व इंजिनचे, डिझेल टाकीचे तसेच सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याची तोडफोड करुन नुकसान केलेले दिसले. तसेच घरातील एकुण ४ लाख ३९ हजार रुपए किंमतीचे सोन्याचे दागीने व गृहोपयोगी सामान चोरीस गेल्याचे दिसून आले.
अच्युत रघुनाथ पोपळघट यांच्या फिर्यादीवरून आरोपी सदानंद घनश्याम पोपळघट, घनश्याम दत्तात्रय पोपळघट, रेणुका घनश्याम पोपळघट, मेघना घनश्याम पोपळघट, सर्व रा. शनी चौक, राहुरी, अशा ४ जणांवर गुन्हा रजि. नं. ३२७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (१), ३२४ (५) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
