Type Here to Get Search Results !

राहुरी - नवीन बोट उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घ्यावा - मा. खा. तनपुरे

 नवीन बोट उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घ्यावा- मा. खा. तनपुरे.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


मुळा धरणाच्या पाण्यावर बारागांव नांदूर ते जांभळी दरम्यान चालणारी प्रवासी यांत्रिक बोट कालबाह्य झाल्याने वारंवार नादुरुस्त होत आहे. त्यामुळे धरणाच्या पलीकडील तीन गावांचा राहुरी तालुक्याशी वारंवार संपर्क तुटत आहे. येथे अत्याधुनिक नवीन यांत्रिक बोट उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली आहे.


तनपुरे म्हणाले की, मुळा धरण झाल्यावर जल फुगवट्यामुळे वावरथ, जांभळी व जांभुळबन या गावांना पाण्याचा वेढा पडला. या गावांमधील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी राहुरी येथे येण्या- जाण्यासाठी जांभळी व बारागांव नांदूर दरम्यान धरणातील पाण्यावर चालणारी यांत्रिक बोट मोठा आधार आहे. या बोटीमुळे प्रवाशांचा वेळ, पैसा आणि राष्ट्रीय संपत्ती असलेल्या इंधनाची मोठी बचत होते. 


सध्याची बोट कालबाह्य झाली आहे. बोटीचा गिअरबॉक्स वारंवार तुटत आहे. याच कारणामुळे चार-पाच दिवसांपासून बोट बंद पडली आहे. या ठिकाणी नवीन अत्याधुनिक यांत्रिक बोटीची नितांत गरज आहे. २०२१ साली तत्कालीन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजनाच्या निधीतून नवीन यांत्रिक बोटीसाठी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. जिल्हा परिषदेमार्फत निविदा काढून गुजराथ राज्यातील एका ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. 


ठेकेदाराने पैसे घेऊन बोटीचे काम ६० टक्के करून बोट बांधणी बंद केली. शासनाचे पैसे गेले आणि बोटही गेली, अशी परिस्थिती झाली आहे. पाच वर्षांपासून प्रवासी नवीन बोटीची वाट पाहात आहेत. या भागाचा त्याग मोठा आहे. येथील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यामुळे मुळा धरण, केके रेंज, महात्मा फुले कृषी विद्यापीठ असे प्रकल्प उभे राहिले आहेत. बोट बंद पडल्याने या प्रवाशांना मासेमारी करणाऱ्या छोट्या होडीतून जीवघेणा जलप्रवास करावा लागत आहे. 


मुळा धरणात २००२ साली अशीच छोटी होडी बुडाल्याने तीन जणांना पाण्यात जीव गमवावा लागला होता. त्याच्या कटू आठवणी आजही ताज्या आहेत.  त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांसह प्रवास करता येईल अशी अत्याधुनिक यांत्रिक बोट उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन दुर्गम तीन गावांमध्ये ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी अशी मागणी आहे, असेही तनपुरे यांनी सांगितले.