प्राथमिक शाळा हाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खरा पाया – बा. ठ. झावरे
वासुंदे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवगत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत!
पारनेर/प्रतिनिधी :
शिक्षण हाच ग्रामीण भागाच्या विकासाचा खरा पाया आहे. जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत प्रशासन, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि ग्रामस्थांनी एकत्रित येऊन केलेले हे नवागतांचे स्वागत कौतुकास्पद आहे. जेव्हा संपूर्ण गाव आणि शाळा मिळून प्रयत्न करतात, तेव्हाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि शाळेच्या सक्षमीकरणासाठी आम्ही सर्व स्तरांतून सदैव कटिबद्ध राहू. असे मत श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा. ठ. झावरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून १५ जून रोजी नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी नवीन कपडे, नवीन दप्तरे घेऊन लगबग करत नवीन विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन झाले. वासुंदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये या नवागत विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले.
प्राथमिक शाळा हा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा आणि शिक्षणाचा पाया समजला जातो. हाच पाया मजबूत करण्यासाठी आणि पहिल्याच दिवशी मुलांच्या मनात शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या पहिल्या दिवशी आलेल्या चिमुरड्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता.
या विशेष कार्यक्रमासाठी वासुंदे गावच्या गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, गावच्या सरपंच विमल झावरे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, पी. डी. बर्वे, बापूसाहेब गायके आणि शिवाजी झावरे सर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट हिंगडे, पा. ल. बर्वे, हरिभाऊ गायखे, शालेय व्यवस्थापन सदस्या कावेरी झावरे, केंद्रप्रमुख श्री. लोंढे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता रोहकले मॅडम, सहशिक्षिका शेळकंदे मॅडम, जाधव मॅडम आणि पवार मॅडम आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षिकांनी व व्यवस्थापन समितीने विशेष परिश्रम घेतले. पहिल्याच दिवशी झालेल्या या सुंदर स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अत्यंत संस्मरणीय ठरला.
चौकट :
शाळेचा पहिला दिवस हा मुलांच्या आयुष्यातील एक टप्पा असतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर शाळेत आलेल्या नवगत विद्यार्थ्यांचे हसतमुखाने स्वागत करताना सर्व शिक्षिकांना व ग्रामस्थांना मनापासून आनंद होत आहे. जिल्हा परिषद शाळा हाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खरा पाया आहे. असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट हिंगडे व सर्व शिक्षक वृंद यांनी सांगितले.
