टाकळी ढोकेश्वर : कृषी उपबाजारासाठी गट नं. ९६२ ची जागा देऊ नये - माजी सरपंच शिवाजी खिलारी. पारनेर /प्रतिनिधी
मौजे टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ९६२ मधील जागा कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर उपबाजारासाठी देण्याच्या ठरावाला तीव्र विरोध व्यक्त करत माजी सरपंच शिवाजी सिताराम खिलारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, जागा दिल्यास रस्त्यावर उतरून उपोषण करण्याची इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरने यापूर्वी गट नं. ८४२/१ खरेदी केली होती. मात्र संचालकांनी ती जागा संगनमताने विकल्याने तेथे इमारती उभ्या राहिल्या. त्याबदल्यात समितीला गट नं. १६४ मधील कल्याण रोड लगतची जमीन दिली होती. तरीही ग्रामपंचायत सरपंच यांनी गट नं. ९६२ मधील दोन हेक्टर जागा बाजार समितीला देण्याचा ठराव दि. २९ मे २०२३ रोजीच्या ग्रामसभेत मंजूर केला. या ठरावाचे सुचक श्री. प्रदीप बबनराव खिलारी व अनुमोदक सौ. सुनिता जयसिंग झावरे होते.
मात्र त्याच ग्रामसभेत शिवाजी सिताराम खिलारी व गणेश बबन चव्हाण यांनी या ठरावाला विरोध दर्शवित स्वतंत्र ठराव मांडला होता. बाजार समितीकडे आधीच स्वतःची जागा असल्याने ग्रामपंचायतीची अतिरिक्त जागा देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही सरपंच यांनी विरोध असताना खोटा ठराव करून बाजार समितीला जागा देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी सरपंच यांनी केला आहे.
शिवाजी सिताराम खिलारी, माजी सरपंच, टाकळी ढोकेश्वर यांचे मत :
“कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर उपबाजारासाठी आमच्या गावातील गट नं. ९६२ मधील कोणतीही जागा देण्यात येऊ नये. आम्ही यापूर्वीच ग्रामसभेत विरोध व्यक्त केला होता. सरपंचांनी विरोध दडपून खोटा ठराव पास केला आहे. ही ग्रामस्थांची फसवणूक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हा ठराव रद्द करावा, अन्यथा संपूर्ण गाव रस्त्यावर उतरून उपोषण करेल. शेतीप्रधान भागात शेतकऱ्यांची जमीन वाचवणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.”
ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी अधिक तपास व कार्यवाही होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
