नांदेड - सिंदखेड पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे शेतकऱ्याला मिळाले जीवनदान..
प्रतिनिधि : मजहर शेख, नांदेड
नांदेड/माहुर,दि:-16:- आज रोजी सकाळी अंदाजे 11.00 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन सिंदखेड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड आणि पोलीस कॉन्स्टेबल संदीप वानखेडे हे नियमित पेट्रोलिंगसाठी वाई बाजारच्या दिशेने जात होते. दरम्यान, माहुर तालुक्यातील मौजे मनिरामथड येथे शेतशिवारात एका व्यक्तीस शेतातील पाण्याच्या मोटारीच्या विद्युत तारेला करंट लागून तो त्यास चिकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सरकारी वाहन थांबविले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी जवळील झाडाच्या लाकडाचा वापर करून संबंधित व्यक्तीस विद्युत प्रवाहापासून सुरक्षितपणे दूर केले. पोलिसांच्या या तत्पर आणि धाडसी कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. सदर व्यक्तीचे नाव दीपक पेटकुळे राहनार करंजीता माहुर असे असून त्यास तात्काळ पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून वैद्यकीय उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दाखविलेली कार्यतत्परता, धाडस आणि मानवतेची भावना यामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले असून परिसरातील नागरिकांकडून सिंदखेड पोलिसांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. सदर धाडसी व कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल मा. श्री. अबिनाश कुमार नांदेड पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमनदार यांचे विशेष कौतुक केले. कर्तव्य बजावताना दाखविलेली तत्परता, प्रसंगावधान आणि जनसेवेप्रती असलेली बांधिलकी ही पोलीस दलासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
