Type Here to Get Search Results !

श्रीगोंदा - माध्यम क्षेत्रातून भाजपच्या राज्यस्तरीय जबाबदारीपर्यंत श्रीगोंद्याचे अमोल कविटकर यांची दमदार वाटचाल - महाराष्ट्र प्रदेश भाजप माध्यम विभागाच्या दौरा समन्वयकपदी निवड


 

माध्यम क्षेत्रातून भाजपच्या राज्यस्तरीय जबाबदारीपर्यंत श्रीगोंद्याचे अमोल कविटकर यांची दमदार वाटचाल

महाराष्ट्र प्रदेश भाजप माध्यम विभागाच्या दौरा समन्वयकपदी निवड

श्रीगोंदा 

पत्रकारितेतील अभ्यासू कार्यशैली, संघटनात्मक कौशल्य आणि पक्षनिष्ठेची दखल घेत भारतीय जनता पक्षाने श्रीगोंद्याचे युवा कार्यकर्ते अमोल कविटकर यांची महाराष्ट्र प्रदेश भाजप माध्यम विभागाच्या दौरा समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.


मूळचे श्रीगोंदा येथील रहिवासी असलेले अमोल कविटकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्थानिक वृत्तवाहिनीतून केली. त्यानंतर एबीपी माझा तसेच पुण्यात साम मराठी आणि जय महाराष्ट्र या वृत्तवाहिन्यांमध्ये काम करत त्यांनी पत्रकारितेत स्वतंत्र ओळख निर्माण केली. माध्यम क्षेत्रातील अनुभव, संवादकौशल्य आणि संघटनात्मक कार्यपद्धतीच्या बळावर त्यांनी भारतीय जनता पक्षात सक्रियपणे काम करत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या.


पक्षासाठी सातत्याने केलेले काम, नियोजन क्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेला समन्वय याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर राज्यस्तरीय जबाबदारी सोपविली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही अमोल कविटकर यांची ओळख आहे.


या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर तसेच आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


अमोल कविटकर यांच्या या नियुक्तीमुळे श्रीगोंद्याच्या युवा पिढीसाठी राज्यस्तरावर कार्य करण्याची नवी प्रेरणा निर्माण झाली असून, त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.