पारनेरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
पारनेर/प्रतिनिधी :
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधातील मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने पारनेर तालुक्यात धडक कारवाई करत ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून वाहन मालक फरार आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध वाळू वाहतुकीची माहिती घेत गस्त घालत होते. दरम्यान, टाकळी ढोकेश्वर येथील दीपक पोपट साळवे हा खडकवाडी परिसरातून आयशर वाहनाद्वारे अवैधरित्या वाळू वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी कामटवाडी शिवारातील हांडेवाडा परिसरात सापळा रचला. तेथे संशयित आयशर वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना शासनाच्या मालकीची वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. चालक दत्तात्रय नाना मेंगाळ (वय २५, रा. खडकवाडी) याला ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान २० हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू आणि ८ लाख रुपये किमतीचा आयशर डंपर असा एकूण ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

