दूध उत्पादक महिला भगिनींसाठी मोफत पंढरपूर वारी
संदीप रोहोकले यांच्या पुढाकारातून शेकडो महिलांना श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाचा लाभ
पारनेर/प्रतिनिधी :
भाळवणी येथील वैभव दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अहिल्यानगर)चे जिल्हा उपाध्यक्ष संदीप रोहोकले यांच्या विशेष पुढाकारातून दूध उत्पादक व शेतकरी महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेली ‘श्री क्षेत्र भाळवणी ते श्री क्षेत्र पंढरपूर’ एकदिवसीय मोफत पंढरपूर वारी भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या वारीत परिसरातील शेकडो दूध उत्पादक महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपूरची यात्रा केली.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्याची प्रत्येक वारकऱ्याची मनापासून इच्छा असते. मात्र, दैनंदिन जीवनातील धावपळ, शेतीची कामे, पशुपालनाची जबाबदारी आणि घरगुती कर्तव्यांमुळे अनेक कष्टकरी महिलांना वारीत सहभागी होणे शक्य होत नाही. विशेषतः दूध व्यवसायाशी निगडित महिला पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध कामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांना स्वतःसाठी वेळ देणेही कठीण जाते.
महिला भगिनींची हीच अडचण लक्षात घेऊन आणि त्यांना विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संदीप रोहोकले यांनी चार वर्षांपूर्वी या सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळत असून यंदाही दूध उत्पादक महिलांसह शेतकरी महिलांसाठी मोफत एकदिवसीय पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले होते.
दि. २४ रोजी पहाटे भाळवणी येथून तीन ट्रॅव्हल्स वाहनांमधून महिला भगिनी पंढरपूरकडे रवाना झाल्या. यावेळी आमदार काशिनाथ दाते सहपत्नीक, वसंत चेडे, संदीप ठुबे, संभाजी रोहोकले, प्रकाश रोहोकले, पवन रोहोकले, मधुकर रोहोकले, सोपान लोंढे, नारायण राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रवासादरम्यान टाळ-मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि ज्ञानोबा-तुकारामांच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते.
वारीदरम्यान कुरकुंभ येथे महिलांनी सामूहिक हरिपाठ केला. तसेच संपूर्ण प्रवासात चहा, नाश्ता व भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती. पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर सर्व महिला भगिनींनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि भक्तीभावाने प्रार्थना केली. दर्शनानंतर महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.
या वारीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संदीप रोहोकले मित्र मंडळातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या आध्यात्मिक समाधानासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
चौकट :
दूध उत्पादक आणि शेतकरी महिला भगिनी आपल्या कुटुंबासाठी, शेतीसाठी आणि पशुपालनासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या त्यागामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम राहते. अशा कष्टकरी महिलांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सहजपणे घेता यावे, त्यांना दैनंदिन कामकाजातून काही क्षणांचा आनंद आणि अध्यात्मिक समाधान मिळावे, या भावनेतून आम्ही चार वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत. महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, समाधान आणि भक्तिभाव हेच आमच्यासाठी सर्वात मोठे यश आहे. पुढील काळातही सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात असे लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.
— संदीप रोहोकले, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अहिल्यानगर) तथा अध्यक्ष, वैभव दूध उद्योग समूह
