Type Here to Get Search Results !

पारनेर - अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला आरपीआयचा तीव्र विरोध; तहसीलदारांना निवेदन


 


अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला आरपीआयचा तीव्र विरोध; तहसीलदारांना निवेदन


पारनेर/प्रतिनिधी :

अनुसूचित जाती (SC) आरक्षणामध्ये उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) करण्याच्या प्रस्तावित निर्णयाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पारनेर तालुक्याच्या वतीने तीव्र विरोध दर्शविण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पारनेर तहसीलदारांना निवेदन देऊन हा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय समाजाच्या एकात्मतेसाठी घातक ठरू शकतो. या निर्णयामुळे अनुसूचित जातीतील विविध घटकांमध्ये फूट पडण्याची शक्यता असून परस्परांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. परिणामी सामाजिक सलोखा, बंधुता आणि ऐक्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना सामाजिक न्याय आणि समानतेच्या तत्त्वावर आरक्षणाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या विद्यमान स्वरूपात कोणताही बदल न करता ते पूर्ववत कायम ठेवणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. शासनाने जनभावना आणि सामाजिक परिणामांचा गांभीर्याने विचार करून अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी आरपीआय पारनेर तालुका उपाध्यक्ष राजेश साठे, प्रदीप नगरे, तुषार गायकवाड, संगम सोनवणे, आदेश गायकवाड, तुषार सोनवणे, संतोष गायकवाड, शांताराम पाडळे, मुकुंद गायकवाड, अशोक गायकवाड, संजय गायकवाड, सुरेश गायकवाड, भूषण गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


चौकट : 


अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण हा निर्णय सामाजिक ऐक्याला तडा देणारा ठरू शकतो. संविधानाने दिलेल्या समानता आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर कोणताही आघात होऊ नये, ही आमची भूमिका आहे. अनुसूचित जाती समाज एकसंध राहावा आणि आरक्षणाचा लाभ सर्व घटकांना पूर्ववत मिळत राहावा यासाठी शासनाने उपवर्गीकरणाचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा. समाजामध्ये फूट पाडणारा कोणताही निर्णय आम्ही स्वीकारणार नाही.


 – राजेंद्र उबाळे, तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,