संगमनेरच्या स्वतंत्र RTO कार्यालयाला गती; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला परिवहन मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
नव्या शासन निकषांनुसार प्रस्ताव सादर करण्याचे अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश; संगमनेर-अकोलेच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची आशा
मुंबई / संगमनेर | प्रतिनिधी शाविद शेख
संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) स्थापन करण्याच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला आता वेग मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार सत्यजीत तांबे यांनी मुंबई येथे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची भेट घेऊन संगमनेर, अकोले तसेच परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र RTO कार्यालय मंजूर करण्याची मागणी केली. या बैठकीत परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना नव्या शासन निकषांनुसार संगमनेरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी-विक्री होत असते. मात्र वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन कर भरणा आणि इतर परिवहन विभागाच्या सेवांसाठी संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांना दूरच्या RTO कार्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याने स्वतंत्र RTO कार्यालयाची मागणी सातत्याने होत होती.
या प्रश्नासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. २४ मार्च २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतंत्र RTO कार्यालयाची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी काही तांत्रिक कारणांमुळे स्वतंत्र RTO ऐवजी कॅम्प ऑफिसला मंजुरी देण्यात आली. मात्र ते अद्याप कार्यान्वित झालेले नसल्याने ते तातडीने सुरू करावे आणि पुढे संगमनेरसाठी स्वतंत्र RTO मंजूर करावे, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर जुलै २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत हा प्रश्न पुन्हा प्रभावीपणे उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
आता नव्या शासन निकषांच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे संगमनेरच्या स्वतंत्र RTO कार्यालयाच्या आशा पुन्हा बळावल्या आहेत. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास संगमनेर, अकोले आणि परिसरातील लाखो नागरिकांना वाहनविषयक सर्व शासकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचण्यास मदत होणार असून परिसराच्या विकासालाही चालना मिळणार आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत या मागणीसाठी पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वास आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला आहे.

