Type Here to Get Search Results !

वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज

 वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज

 

प्रतिनिधी (सुनिल पिंगळे) - गेली दोन वर्ष जगावर कोरोना महामारीच संकट घोंगावत आहे. जगातील अनेक देशांची अर्थ व्यवस्था कोलमडून पडली आहे. या संकटाने जिवीत व वित्त हानी सामना करावा लागला. ज्यांना कोरोना संकटाने घेरले त्यांना ऑक्सिजन सिलेंडर,व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन मिळवण्यासाठी किती धावपळ व न मिळाल्याने प्राण गमवावे लागले. तेंव्हा प्राणवायूच महत्व लोकांना कळले. कोरोना रुग्ण उपचार घेऊन बाहेर पडल्या नंतर अनेक सामाजिक संस्था प्राणवायूचे महत्व पटवण्यासाठी वृक्ष भेट देत आहेत.  सध्या भारतात रुग्णांना ऑक्सिजनचा नियमित पुरवठा करणं, हे आरोग्य व्यवस्थे समोरचं सर्वात मोठं आव्हान बनलं आहे. आपणास प्राणवायू निसर्गतः मिळवायचा असेल तर देशी वृक्ष लागवड व संवर्धन उद्याच्या भविष्याची गरज आहे. 

              ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन तो आपण राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. या दिवसाच्या निमित्त खऱ्या अर्थाने युवा पिढी पुढे केवळ वृक्षरोपण नको त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. हे शिकवले पाहिजे. वृक्षारोपणाचा केवळ देखावा नको. सतत व जास्त प्रमाणात प्राणवायू निर्माण करणारे अनेक देशी वृक्ष आहेत. त्या विषयी सखोल माहिती असणे अवश्य आहे. विदेशी झाडे हि कोणत्याच फायद्याची नाहीत. सन १९७२ च्या दुष्काळी परिस्थिती नंतर देशात अनेक देशी वृक्ष व औषधी वनस्पती नष्ट करून विदेशी वृक्षांचे अतिक्रमण झाले. त्यामुळे पर्यावरणात बदल दिसून आले.आज कोरोना सारखे संकट पाहता हवेतून ऑक्सिजन मिळवण्याचे कारखाने उभे करावयाचे झाले तर देशी वृक्ष मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतील. यासाठी स्थानिक  स्वराज्य संस्था ,सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी व वन विभाग या मार्फत लोक चळवळ उभी केली पाहिजे. हाच लोकसहभाग भविष्याचा तर्क मार्ग ठरणार आहे.   

     सजीवांना जिवंत राहण्याकरिता प्राणवायूची नितांत गरज असते. सारे सजीव श्‍वासोच्छवासाद्वारे हवेतून प्राणवायू घेतात व उच्छश्‍वासाद्वारे कार्बन वायू सोडत असतात. हि क्रिया पार पडण्यासाठी वसुंधरेने पृथ्वीवर सजीव निर्माण झाल्या पासून कमी पडू दिला नाही.  सर्व सजीव वनस्पती हवेतील कार्ब न वायू शोषून घेतात. कार्बनडाय ऑक्साईडतील कर्ब वायूचा उपयोग अन्नासाठी करून प्राणवायू सातत्याने बाहेर सोडत असतात. त्यामुळे पृथ्वी वरील प्राणवायूचे संतुलन कायम राहते,तर दिवसेंदिवस विकास कामाच्या नावाखाली झपाट्याने जंगल कमी होत आहे. वास्तविक  भूपृष्ठावर ३३ टक्के वनाच्छादन असले पाहिजे. भारतात ते आता कमी होत चालेले आहे. त्यामुळे प्राणवायूचे संतुलन कमी झाले आहे. याची जाणीव सर्वाना झाली पाहिजे. वनक्षेत्रात अनेक प्रकारे अतिक्रमण झाले आहे. सन २०११ पासून २०१५ राज्यातील दीड लाख हेक्टर जंगल केवळ आगी लागून खाक झाली आहेत तर मागील पाच वर्षात दरवर्षी सरासरी ६२.हजार एकर जंगल नष्ट होत आहे. ही आकडेवारी भीषण आहे. हे जंगल सारे आगीत नष्ट झालेले नसून 'तथाकथित' विकासाच्या भक्ष्यस्थानी हि पडले आहे. मानव निर्मित व नैसर्गिक आगीत भारतात जंगलाचे दरवर्षी ११०० कोटी रुपयांचे नुकसान होते. असे सतत घडत राहिले तर भविष्यात ऑक्सिजनचे सिलेंडर घरात घेऊन ठेवावे लागतील. 

           निसर्ग प्रेमी मंडळींनी पर्यावरणा साठी देशी पद्धतीची व आयुर्मान जास्त असलेली, खोलवर रुजणारी झाडे लावण्या बाबत मोहीम हाती घेतली पाहिजे  बहुपयोगी वड ,पिंपळ, चिंच ,फणस ,आवळा, आंबा, बेल, कडुनिंब, मोह, कदंब, पळस, लाख, साल, कवठ या शिवाय साधी बाभूळ , हिवर, धावडा, आपटा, भोकर, आवळा , पांगारा, पिपरी, नांदूक, मोह, पारिजातक, शिंदी, करंज, चंदन, कुसुम, बिबवा, खैर, हिंगण, गोधन, रानभेंडी, अर्जुन अशी भारतीय देशी झाडे हि ऑक्सिजन लंग्ज म्हणून ओळखली जातात. पिंपळ, कडुलिंब, तुळस, वड आणि बांबू सतत प्राणवायू देत असतो . तर करवंदं , तरवड, मुरुडशेंग, निर्गुडी, अश्वगंधा, बोरकर, हि झुडपे वेलीत गुंज, शेवरी, कावळी , अनंतमूळ तर  फळ झाडात रामफळ, अंजीर, सीताफळ, चिक्कू, पेरू, तुती, शेवगा,  हादगा, लिम्बुनी, जांभूळ तर गवतात कुसळी गवत, एकदांडी, माकडशिंगी, पसरी गवत, गोधडी  हे गवत केवळ खाद्य नव्हे तर चांगल्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करतात. शास्त्रीय माहिती न घेता निसर्गाशी नाते जोडणे पर्यावरणासाठी व मानवी अस्तित्वासाठी धोक्याचे आहे. मॉडर्नपणाच्या खोट्या समजुतीने  परदेशी कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस ,सप्तपर्णी ,स्पॅथोडिया, रेन ट्री अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे. अनेकांनी वास्तुनिवास शुशोभीकरणात तुळस वगळता सर्व विदेशी वृक्ष दिसतात पण ही परदेशी झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरुन सिध्द झाले आहे. गृहप्रकल्प, कारखानदारी उभी राहील्याने हवेच्या प्रदुषणामुळे पशु, पक्षी मुळचा आदिवास सोडून स्थलांतरीत झाले. आजही गाव, गायरान, शहर व प्रकल्प मध्ये गुलमोहर, निलगीरी, लिरीसीडीया, सुरु, सायफस, सुभाबळ, व ऑस्ट्रेलियन बाभळ अशी विदेशी झाडे दिसू लागली आहे. बहुउपयोगी व वनौषधी देशी वृक्षांची लागवड न झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत गेला देशी वृक्ष जनावरांचा चारा व पक्षांचं आश्रय स्थान आहे. देशी वृक्षांची फळे, पाला, शेंगा, साल खाल्याने माकड, जनावरांस व मानवास कोणताही दुष्परिणाम होत नाही. येणाऱ्या काळात  पक्षांचा थवा, किलबिलाट, हरणाचे बागडणे, जंगलाबाहेर न पडणारे हिंस्त्र पशु पहावयाचे असेल तर निसर्गाचे सौंदर्य टिकवण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे.   

           वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।

             पक्षी ही सुस्वरें आळविती 

               संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून पर्यावरणाची विविधता साधली आहे. वृक्ष आपले मित्र असून मानवी जीवनात अनेक उपयोग होत असतात ते कधीच मानवावर अन्याय करत नाही. परंतु मानवाने स्वतः च्या फायद्यासाठी जंगले नष्ट केली त्यामुळे अवकाळी पाऊस, हवामानातील बदल, तापमानात वाढ, अनेक पक्षाचे अस्तित्व नाहीसे होणे हे आता दिसून येत आहेत.

        तर भविष्यकाळात पुढील पिढी सुखाने जगू द्यायची असेल तर पर्यावरण समृद्ध करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. निसर्ग समृद्ध तर मानवी जीवन समृद्ध! भविष्यात प्राणवायू मुळे कोणाचा जीव गमवावा असे वाटत नसेल तर निसर्गाची समृद्धता टिकवण्यासाठी देशी वृक्षरोपण व संवर्धन हि व्यापक चळवळ उभी करून भविष्याच्या दुरष्टाने महत्वाची आहे