डॉ. विजय मकासरे यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला.
अब्रू नुकसानीचा मानहानीचा दावा दाखल करणार असून कायदेशीर कारवाई करणार- डाॅ. विजय मकासरे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा खोटा असून तो रद्द होण्यासाठी डाॅ. मकासरे यांनी उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. त्याचा निकाल लागला असून डाॅ. मकासरे यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात आलाय.
सदर प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका जुन्या गुन्हयातून डॉ. विजय मकासरे यांचे नाव वगळण्यासाठी पोलीस ठाण्यातील पोलीसांनी लाचेची मागणी केल्यामुळे डॉ. विजय मकासरे यांनी सदर पोलीसां विरुध्द लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची पडताळणी करणेकामी लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पंचासह डॉ. मकासरे यांना त्यांच्या फॉरच्युनर गाडीमध्ये पोलीस ठाण्या समोर पाठविले होते.
परंतु लावलेला सापळा अयशस्वी झाल्यामुळे डॉ. मकासरे व पंच हे ठरलेल्या ठिकाणी निघाले होते. परंतु सापळा लावल्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी रिचर्ड गायकवाड या पोलीस कर्मचाऱ्याला पाठवून डॉ. मकासरे यांची गाडी पोलीस ठाण्यात घेऊन येण्याचे सांगितले.
तथापि डॉ. मकासरे हे त्यांची गाडी घेऊन जात असताना पो. नि. श्रीहरी बहिरट यांच्या सांगण्यावरून पो. कॉ. रिचर्ड गायकवाड हे जबरदस्तीने गाडीत बसून गाडी पोलीस स्टेशन मध्ये घेण्यासाठी जबरदस्ती करत होते. परंतु डॉ. मकासरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन त्यांची गाडी बेलापूर रोडने नेली. हे सर्व रिचर्ड गायकवाड यांनी पो. नि. श्रीहरी बहिरट यांना फोन करून बेलापूर रोडला येण्यास सांगितले.
म्हणून पो. नि. श्रीहरी बहिरट व पोलीस कर्मचारी किशोर जाधव यांनी खाजगी गाडीने डॉ. विजय मकासरे यांच्या गाडीचा पाठलाग करुन डॉ. मकासरे यांच्या गाडीला गाडी आडवी लावली व डॉ. मकासरे यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्याच्या उद्देशाने धावून आले. हे चालू असतांनाच लाचलुचपत विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले व त्यांनी डॉ. विजय मकासरे यांची सुटका केली.
