पक्षी प्रेमींकडून पक्षी गणना मोहिम.
पक्षी गणनेत या वर्षी ३ हजार १५८ पक्षी आढळून आले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयातील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे कृषि विद्यापीठ परिसरात पक्षी गणना करण्यात आली. पक्षी गणना हा उपक्रम सलग ९ व्या वर्षी ५ किलोमीटर चौरस परिसरात ३२ विदयार्थीनी ४७ विदयार्थी व ५ अध्यापक अशा ८४ पक्षी प्रेमींनी १२ गटातून ही गणना केली. पक्षी गणनेत या वर्षी ३ हजार १५८ पक्षी आढळून आले. यासाठी विदयापीठातील १२ ठिकाणांची निवड करण्यात आली.
दरवर्षी जानेवारी महिन्यात ही गणना त्याच ठिकाणी करण्यात येते. विदयार्थ्यांना निसर्ग पक्षी प्राणी यांची जवळीक निर्माण व्हावी. या हेतुने पक्षी गणना मोहीम राबविली जाते. महात्मा फुले कृषि विदयापीठातील शालेय परिसर, घरमाडी टेकडी, शेडगे वस्ती, धन्वंतरी विभाग, सडे रोड, उदयान विदया विभाग, पाट पूर्व व पाट पश्चिम इत्यादी बारा ठिकाणी हरित सेनेच्या गटागटाने हे काम उत्साहात केले. तत्पुर्वी प्रत्येक गट प्रमुखाकडे महाराष्ट्रात आढळणाऱ्या पक्षांचे नावे व फोटो असलेला कागद व नावांचा चार्ट देण्यात आला होता. तसेच मोबाईलमध्ये महाराष्ट्रात आढळणाऱ्या पक्षांचे फोटो महितीसह विदयार्थ्यांना देण्यात आली.
हातात पॅड, पेन्सिल, पक्षांचे फोटो घेऊन भल्या सकाळी निसर्गाच्या सान्निध्यात सर्व टिमने आनंदात कार्य पार पाडले. पक्षांची आगळीवेगळी दुनिया पाहून मुले मुली भारवून गेली. सर्वांचे आकर्षण होते. अहमदनगर जिल्हयाचा मानकरी ठरलेला खंड्या पक्षी मुळा कालव्याच्या दोन्ही घडीला बसून सकाळी आपले भक्ष शोधतांना अनेकांना दिसला. विशेष म्हणजे मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षी खंडया पक्षांची संख्या वाढलेली दिसली. अनेकांनी मोरांचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये टिपले.
विदयापीठ परिसरातील फळबागा, पाणी व शिकारीला बंदी यामुळे कृषि विदयापीठ हे पक्षांकरिता पक्षी अभयारण्य ठरतं आहे. बगळे, कावळे, चिमण्या, कोतवाल, चिरक, बुलबुल, भारव्दाज, पोपट, साळुंकी, तुतवार इत्यादी पक्षी गुण्या गोविंदाने येथे वास्तव्यास आहे. धरमाडी टेकडी परिसर हा पोपट, मोर, कोतवाल, बुलबुल यांचे आश्रयस्थान आहे.
