Type Here to Get Search Results !

राहुरी - अनावधाने खात्यावर आलेले ४० लाख रूपये परत केले, सचिन ठुबे यांच्या प्रामाणिकपणाचे तालूक्यातून कौतुक.

 अनावधाने खात्यावर आलेले ४० लाख रूपये परत केले.

सचिन ठुबे यांच्या प्रामाणिकपणाचे तालूक्यातून कौतुक.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


अचानक जर तुमच्या बँक खात्यावर चाळीस लाख रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आला तर ? तुम्हाला कुणाकडूनही येणे नाही, तुमची कुणाकडेही बाकी नाही, तुम्ही कुणाकडेही पैशाची मागणी केलेली नाही, तरीही तुमच्या बँक खात्यावर अचानक ४० लाख रुपये जमा झाले तर ?


होय, हे खरे आहे. राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रीनअप कंपनीच्या बँक खात्यात ३० डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी अचानक चाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक सचिन ठुबे यांच्या मोबाईलवर आला. जमा झालेल्या रकमेबाबत शंका वाटल्याने सचिन ठुबे यांनी बँकेत चौकशी केली. 


हे पैसे कशाचे आले, कुणी पाठवले, आपल्याला तर कुणाकडून येणे नाही, मग आले कोठून, रक्कम आलीय पण खाते उताऱ्यावर जमा नोंदीत डिटेल्स काहीही नाही. असे अनेक प्रश्न त्यानंतर निर्माण झाले. त्यामुळे संबंधित सचिन ठुबे यांनी बँकेला हे चाळीस लाख माझे नाही असे कळवले. सोबत राहुरी पोलिसांना देखील घडलेल्या प्रकाराची लेखी माहिती दिली. व शोध घेऊन ही रक्कम ज्याची असेल त्याला परत करा.कुणावर अन्याय व्हायला नको असे, सांगितले. 


परंतु ३१ डिसेंबरचा महिना अखेर, शनिवार, रविवार सुट्टी असल्याने या रकमे बाबत अधिक तपशील उपलब्ध होत नव्हता. अखेर सोमवारी म्हणजे दोन जानेवारीला सेंट्रल प्लॅन स्किम मोनेटरींग सिस्टीम कडून ही रक्कम जमा झाल्याचे बँकेने जाहीर केले. आता ही संस्था नेमके काय काम करते, तीने कशाचे पैसे जमा केले, हे कळायला मार्ग नव्हता.


 त्यामुळे झालेला प्रकार पुन्हा सचिन ठुबे यांनी राहुरीचे पोलिस निरिक्षक घनश्याम डांगे यांना कळवीला. दरम्यान राहुरी पोलिसांनी देखिल याचा तपास सुरु केला होता. पोलिसांच्या मदतीने अधिक तपशील उपलब्ध झाल्यानंतर सचिन ठुबे यांनी केंद्रीय पातळीवरील त्या संस्थेशी संबंधित पुण्यातील कार्यालयाला स्वतःहून संपर्क केला व तेथील अधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.


 त्यानंतर पुण्यातील अधिकाऱ्यांनी झालेला प्रकार वरिष्ठ कार्यालयाला कळवला व झालेली चूक निदर्शनास आणून दिली. त्या नंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची माहिती घेवून अकाऊंट नंबर चुकल्याने ही रक्कम अनावधानाने तुमच्या खात्यात जमा झाली आहे, असे कळवले. 


अखेर जमा झालेली रक्कम परत करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रीया बुधवारी ४ जानेवारी रोजी पुर्ण झाली. आणि त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. सोबत त्या कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी सचिन ठुबे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतूक करत आभार मानले.  

               

दरम्यान अनावधानाने झालेल्या ह्या प्रकाराची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी नको तो सल्ला देखील दिला. अनेकांनी फोनवरून संबंधित उद्योजकाकडे चौकशी देखील केली. परंतु आपण काय कमवायचं ते प्रामाणिकपणे कमवू, फुकटचा पैसा आपल्याला नको, ज्यांची कुणाची ही रक्कम असेल त्या एखाद्या निष्पाप व्यक्तीवर अन्याय होऊ नये. ही माझी प्रामाणिक भूमिका असल्याचे सचिन ठुबे यांनी सांगितले.


 सचिन ठुबे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, राहुरीचे तहसीलदार फसिओद्दीन शेख, पोलिस निरिक्षक घनश्याम डांगे यांच्यासह अनेकांनी फोनकरून तसेच प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आहे.  


ग्रीनअप कंपनीच्या खात्यावर अनाहूतपणे रक्कम जमा झाल्याचा अर्ज प्रशासनाला प्राप्त झाला होता. त्याचा गुंता सुटला आहे. स्वतःहुन पुढे येऊन प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या सचिन ठुबे यांचे आम्हाला कौतुक आहे. असे मत पोलीस निरीक्षक घनश्याम डांगे यांनी व्यक्त केले.