बस स्थानकाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा- मा. खा. तनपूरे.
पाच कोटीची तरतूद करून निविदा काढण्याचे आदेश होऊन सुद्धा या कामास दिरंगाई का?
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
शिर्डी व शनि शिंगणापूर या देवस्थानच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले राहुरी बस स्थानकाचे काम मार्गी लावण्याचा शब्द अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना राहुरी येथील एका कार्यक्रमात दिला होता. तो त्यांनी पाळून १७ कोटी २५ लाख रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२१ रोजी पाच कोटीची तरतूद करून निविदा काढण्याचे आदेश होऊन सुद्धा या कामास दिरंगाई होत आहे. शासनाने त्वरित लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली आहे.
राहुरी बस स्थानकाची अवस्था अतिशय जीर्ण झाली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यासाठी निधीही दिला. या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. कामाच्या निविदा मागविण्याचा ठरावही झाला. परंतु अद्याप काम
सुरु का झाले नाही ? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या राहुरी बसस्थानकाच्या इमारतीची गेल्या काही वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. प्रसाद तनपुरे यांनी या प्रश्न लक्ष घातले.
माजीमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून मे २०१९ मध्ये बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाकडून १७ कोटी २५ लाख रुपयांच्या कामाला मान्यता दिली गेली. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी शासनाच्या आदेशानुसार राहुरी बस स्थानकाच्या कामासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. या आदेशात एसटी प्रशासनाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी खात्याला शासनाच्या वास्तु विशारदांकडून सविस्तर नकाशे व अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्याच्या तांत्रिक मान्यतेनंतर निविदा मागवण्याचेही आदेश देण्यात आले होते. दरम्यानच्या काळात युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. तेव्हापासून राहुरी बस स्थानकाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. याबाबत आमदार तनपुरे यांनी विधान सभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला परिवहन मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक उत्तर दिले.
शिर्डी, शनिशिंगणापूर, कृषी विद्यापीठ या महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी राहुरी बस स्थानक हे मध्यवर्ती आहे. आज बस स्थानक परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना बस स्थानकाच्या परिसरात थांबणे भीतीदायक व धोकादायक वाटू लागले आहे.
बस स्थानक परिसरात मोठं मोठे खड्डे पडले आहेत. कँटीन अनेक वर्षांपासून बंद आहे. शिर्डीनंतर जास्त उत्पन्न असणाऱ्या राहुरी बस स्थानकाची एवढी दुरावस्था होण्यास एसटी महामंडळाचे नगर व श्रीरामपूर येथील अधिकारी तेवढेच जबाबदार आहेत.
