Type Here to Get Search Results !

पुणे - श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत अर्शिन कुलकर्णीची अष्टपैलू खेळी

 श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत अर्शिन कुलकर्णीची अष्टपैलू  खेळी



ईगल नाशिक टायटन्सचा पुणेरी बाप्पा संघावर दणदणीत विजय   



पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पाचव्या दिवशी अर्शिन कुलकर्णी(नाबाद ११७ धावा व ४-२१) याने केलेल्या अफलातून अष्टपैलू खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने पुणेरी बाप्पा संघाचा केवळ १ धावेने थरारक विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकविले. या विजयामुळे त्यांनी आपले प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले.     महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत पुणेरी बाप्पा व ईगल नाशिक टायटन्स या दोन्ही संघांनी सलग दोन विजयासह आपली घौडदौड कायम राखली होती. त्यामुळे पुणे व नाशिक यांच्यातील चुरस हि केवळ अव्वल स्थानासाठीच नव्हे तर प्ले ऑफ मध्ये पहिले स्थान निश्चित करण्यासाठी पाहायला मिळाली. 

स्पर्धेतील आजच्या सातव्या लढतीत पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसलेने आपल्याच तिसऱ्या चेंडूवर नाशिकच्या हर्षद खडीवालेला जीवदान मिळाले. शॉर्ट कव्हरच्या दिशेने उडालेला झेल पुण्याच्या यश क्षीरसागरने सोडला. त्यानंतर हर्धद खडीवाले(३धावा) व अर्शिन कुलकर्णी(नाबाद २०धावा)यांनी थोडीशी सावध सुरुवात करताना ३.२ षटकात २४ धावा असा धावफलक होता. त्याचवेळी हर्षद खडीवाले चोरटी धाव घेत असताना पुण्याच्या हर्ष सांघवीने धावचीत केले व नाशिकला पहिला धक्का दिला.


महाराष्ट्राचा १९ वर्षाखालील खेळाडू अर्शिन कुलकर्णीने आपला गियर बदलत आक्रमक पवित्रा स्वीकारला. अर्शिन ३७ चेंडूत ३ चौकार व ७ षटकाराच्या मदतीने नाबाद ७२ धावांची तुफानी फलंदाजी करत असतानाच पुण्याच्या पवन शहाने त्याचा झेल सोडून जीवदान दिले व त्याला षटकारही मिळाला. त्यानंतर अर्शिनने रोहन दामलेच्या याच षटकात सलग तीन षटकार मारले व नाबाद ९६ धावांवर पोहोचला. त्यानंतर अर्शिनने ४६ चेंडूत नाबाद १०० धावा करून एमपीएलमधील यावर्षीचे सर्वात जलदगतीने शतक करण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. अर्शिन कुलकर्णी(११७धावा) व राहुल त्रिपाठी(नाबाद ३१) या जोडीने ६४ चेंडूत १३१ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. अर्शिन ११७ धावांवर खेळत असताना शुभम कोठारीच्या चेंडूवर यश क्षीरसागरने त्याचा झेल टिपला. त्यानंतर राहुल त्रिपाठी(४१धावा)बाद झाल्यावर नाशिक संघाचा डाव गडगडला. १९व्या षटकात पियुष साळवीने केवळ १ धाव दिली व षटकात तीन बळी टिपले व अक्षय काळोखे धावबाद झाला. त्यानंतर नाशिक संघाने अखेरच्या षटकात ८ धावा करत २००चा टप्पा पार पडला. 


या आव्हानाला सामोरे जाताना पुणेरी बाप्पा संघ  २०षटकात ८बाद २०२धावाच करू शकला. पुणेरी बाप्पाचा सलामीचा फलदांज पवन शहाने १६ चेंडूत ५ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ३०धावा केल्या. पण त्याचवेळी इझान सय्यदने त्याला झेल बाद केले व पुण्याच्या संघाला पहिला झटका दिला. त्यानंतर यश क्षीरसागर(२२धावा) व रोहन दामले(३३धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ३७ चेंडूत ५७ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. यश क्षीरसागर २७ चेंडूत ४७धावा, तर रोहन दामले(३३ धावा) करून बाद झाले, तेव्हा पुणेरी बाप्पा संघ १२.३ षटकात ४बाद १२० धावावर होता. विजायासाठी पुणेरी बाप्पा संघाला ४५ चेंडूत ८४ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या ऋतुराज गायकवाडने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत २३ चेंडूत ३चौकार व ३षटकारासह ५० धावांची अर्धशतकी खेळी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. त्याला सुरज शिंदे(१७धावा) काढून साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी ३० चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकात ६ चेंडूत ६धावांची आवश्यकता असताना अर्शिनने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतहि कमाल दाखवत पहिल्याच चेंडूवर अद्वैय शिधयेला, तर तिसऱ्या चेंडूवर हर्ष सांघवीला झेल बाद केले व संघाला १ धावेने थराराक विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी अष्टपैलू कामगिरी करणारा अर्शिन कुलकर्णी ठरला.               

स्पर्धेचा सविस्तर निकाल:ईगल नाशिक टायटन्स:२० षटकात ९बाद २०३धावा(अर्शिन कुलकर्णी ११७(५४,३x४,१३x६, राहुल त्रिपाठी ४१(२८,२x४,२x६), कौशल तांबे १०, पियुष साळवी ३-२९, रोहन दामले २-४४, सचिन भोसले १-३७, शुभम कोठारी १-४३) वि.वि.पुणेरी बाप्पा: २०षटकात ८बाद २०२धावा(ऋतुराज गायकवाड ५०(२३,३x४,३x६), यश क्षीरसागर ४७(२७,३x४,३x६), पवन शहा ३०(१६,५x४,१x६), सुरज शिंदे १७, अर्शिन कुलकर्णी ४-२१, प्रशांत सोळंकी २-४३, इझान सय्यद १-३३); सामनावीर- अर्शिन कुलकर्णी; ईगल नाशिक टायटन्स संघ १ धावेने विजयी.