मोटरसायकल चोरास नागरीकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील कणगर येथे दिनांक २ जून २०२३ रोजी रात्री मोटरसायकल चोरून नेत असताना एका भामट्याला नागरीकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच या घटने बाबत दोघा जणांवर मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अविनाश बाळासाहेब गागरे, वय २१ वर्षे, रा. कणगर, ता. राहुरी. हा तरूण दि. २ जून २०२३ रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान त्याची मोटरसायकल क्रमांक एम. एच. १६ बी. जी. ९३१६ या मोटरसायकलवर कणगर येथील एका जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी गेला होता. तेव्हा तेव्हा त्याने मोटारसायकल सुभाष नालकर यांचे घरासमोर लावली होती.
कार्यक्रम झाल्यानंतर अविनाश गागरे हा त्याच्या मोटरसायकल जवळ आला असता त्याची मोटारसायकल दिसली नाही. त्यानंतर त्याने आजुबाजुला मोटरसायकल चा शोध घेतला. मात्र ती मिळुन आली नाही. अविनाशचा मित्र ऋषिकेश राजेंद्र गाडे हा मोटरसायकल चा शोध घेत असताना त्याला मोटरसायकल ही राहुरी फक्टरी रोडच्या दिशेस कणगर खिंडी खाली आरोपी जवळ दिसली.
काही गावकरी घटनास्थळी गेले आणि आरोपीला पकडले. तेव्हा तेथे दुसरा आरोपी आला आणि त्याने त्याला पळवून लावले. त्यानंतर अविनाश गागरे याने मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीस पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
अविनाश बाळासाहेब गागरे याच्या फिर्यादीवरून आरोपी महेश जाधव, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी. (पुर्ण नाव माहित नाही) तसेच दत्तात्रय अशोक वरघुडे, रा. कणगर, ता. राहुरी. या दोघांवर गुन्हा रजि. नं. ५९८/२०२३ भादंवि कलम ३७९, ५११ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
