पोलिस निरीक्षकाला निलंबित करून सह आरोपी करावे- राजूभाऊ आढाव.
नांदेड येथील घटनेचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करून प्रशासनाला निवेदन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त करून त्या जातीयवादी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी. या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आढाव यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पुरोगामी महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. काही जातीयवादी धर्मांध शक्ती सातत्याने मोठ्या प्रमाणावर खून, बलात्कार, जातीय दंगली घडवीत आहेत.
या सर्व प्रकाराला महाराष्ट्रातील शिंदे व फडणवीस सरकार बघायची भूमिका घेत असून जातीयवादाला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था व शांतता बिघडविण्याचे पाप हे जातीयवादी सरकार करीत आहे. त्यांचा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय.
तसेच नांदेड येथील अक्षय भालेराव या तरूणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनामध्ये धरून त्याची जातीयवादी मनुवादी प्रवृत्तीच्या धर्मांध शक्तीच्या लोकांकडून झालेल्या निर्घृण हत्येचा देखील जाहीर निषेध करण्यात आलाय.
अक्षय भालेराव या तरुणाचा खून करण्यापूर्वी खुणाचा कट रचल्याचे सिद्ध होत आहे. सदर गुन्ह्यात भादवी कलम १२० ब हे वाढीव कलम लावण्यात यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास मनाई करणाऱ्या व गुन्हेगारांना साथ देणाऱ्या त्या विभागाचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना तात्काळ निलंबित करून त्यांना सह आरोपी करण्यात यावे.
सदर कुटुंबाला शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून ५० लाख रुपये भरपाई देण्यात यावी, भालेराव कुटुंबाला नागरी हक्क संरक्षण विभागाकडून तात्काळ २४ तास पोलीस संरक्षण देण्यात यावे, सदर गुन्ह्यातील आरोपींच्या पाठीशी असणारे खरे सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांना सदर गुन्ह्यात सह आरोपी करण्यात यावे. सदरचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येऊन लवकरात लवकर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. आदि मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आढाव, जिल्हा उपाध्यक्ष भरत भांबळ, जिल्हा संघटक अमजद पठाण, महिला जिल्हाध्यक्षा यमुना भालेराव, तालुकाध्यक्ष विनोद पवार, तालुका उपाध्यक्ष भाऊ पवार, भानुदास जाधव, युवा सचिव अमोल मकासरे, प्रकाश शिरसाट, मधुकर मनतोडे, आरपीआय महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सिमा बोरूडे, वंचितच्या जिल्हाध्यक्षा वर्षा बाचकर, स्नेहल दिवे, वैशाली आव्हाड आदिंच्या सह्या आहेत.
