रेशनचा तांदूळाने भरलेला ट्रक नागरीकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील टाकळीमियाॅ येथे काही सतर्क नागरीकांनी आज पहाटेच्या दरम्यान विनापरवाना रेशन दुकानातील तांदूळाचा संशयित ट्रक पकडला. त्यानंतर पोलिस प्रशासनाला बोलावून घेत तो तांदूळाने भरलेला ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिला.
राहुरी तालूक्यातील टाकळीमियाॅ येथे आज पहाटे दिड वाजेच्या सुमारास गावातील शाळे जवळ एका ठिकाणी रेशनचा तांदूळाने भरलेला ट्रक काही नागरिकांना दिसून आला. सुमारे १० ते १५ नागरिकांनी या ट्रकला घेराव घातला व त्यामध्ये काय आहे ते तपासले असता त्यामध्ये रेशनचा तांदूळ भरलेला दिसून आला.
यावेळी काही नागरीकांनी पोलिस प्रशासनाला घटनेची माहिती दिली. पोलिस पथक घटना स्थळी पोहचले आणि नागरीकांनी एम एच १६ ए वाय ०७२५ हा पकडलेला ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिला. या घटने बाबत महसूल प्रशासन काय निर्णय घेते व पोलीस प्रशासन काय गुन्हा दाखल करते. याची चर्चा तालूक्यात सुरू आहे.
सदर ट्रक हा नेमके कोणाचा आहे ? शासकीय नियमा नूसार रेशनचे धान्य व तांदूळ सायंकाळी सूर्यास्तानंतर वाहतूक करण्यासाठी बंदी असताना हा रेशनचा तांदूळ नेमका कोठे नेण्यात येणार होता ? व या तांदुळाचा खरा मालक कोण?
याबाबत महसूल व पोलिस प्रशासनामधे चांगली खळबळ उडाली आहे. यावर काय कारवाई होते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
पोलीस प्रशासनाने महसूल प्रशासनाला लेखी पत्र देऊन संबंधित तांदूळा बाबत चौकशी करून अहवाल मागीतला आहे. त्यामुळे सदर तांदूळाची चौकशी झाल्यानंतर पुढची कारवाई होणार असल्याचे दिसत आहे.
चार दिवसापासून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांना धारेवर धरले होते. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये तहसीलदार राजपूत यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. सदर प्रकरण मिटत नाही, तोच रेशनचा तांदूळ रात्रीच्या दरम्यान बेकायदेशीर रित्या वाहतूक करण्याच्या संशयावरून पकडण्यात आला.
याबाबत आता महसूल प्रशासनाची काय भूमिका असणार आहे. तसेच आमदार प्राजक्त तनपूरे याबाबत काय भूमिका घेणार याकडे तालूक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगीतले कि, आम्ही महसूल प्रशासनाला लेखी पत्र पाठवले असून पकडलेला ट्रक कोणाचा व यामध्ये असलेला तांदूळ रेशनचा आहे का? याची माहिती महसूल कडुन मिळाल्या नंतर कारवाई करण्यात येईल. असे त्यांनी सांगीतले.
