Type Here to Get Search Results !

राहुरी - शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी सोशल मिडीया पासून दूर रहावे- चारुदत्त खोंडे.

 शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी सोशल मिडीया पासून दूर रहावे- चारुदत्त खोंडे.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरिक्षक चारुदत्त खोंडे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी विद्यापीठ शाखेचे मँनेजर नवाज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.


याप्रसंगी बोलताना पीएसआय खोंडे म्हणाले की, कोणतेही यश सहज मिळत नाही. सातत्य, पराकाष्ठा आणि आत्मविश्वास याचं एकत्रित फळ म्हणजे यश होय. तुम्ही मिळवलेले सुयश पुढील करियर करिता आत्मविश्वास वाढवणारे आहे. विदयार्थांनी शालेय जीवनात अभ्यासाला महत्त्व देऊन सोशल मीडिया पासून दूर राहिले पाहिजे.


मोबाईल हे दुहेरी अस्त्र आहे. याच मोबाइलवर युट्यूबवर शिकून विदर्भातील मुलीने शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तर चुकीच्या पोस्ट फाॅर्वड केल्यामुळे अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपण कुणाला काय पाठवतोय, कुणाशी काय बोलतोय, याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवलं पाहिजे.


अनेक मुली घरातून सोशल मीडियावर ओळख झालेल्या दूरच्या, परप्रांतीय मुलांबरोबर निघून जातात. तेव्हा पालकांना पश्चात्ताप करण्याची वेळ येते. त्यामुळे सद्वविवेक जागृत ठेवून मुलींनी वर्तन केले पाहिजे. मुलांनी अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर लायसन्स मिळाल्यानंतरच मोटरसायकल हायवे वर  चालवावी. एखादी दुर्घटना घडली तर कायदा सोडत नाही. आयुष्यातील पुढील सोनेरी संधींना यामुळे मुकावे लागेल. याच भान विद्यार्थी आणि पालकांनी ठेवले पाहिजे.


शाखाधिकारी नवाज देशमुख हे शाळेचे माजी विद्यार्थी असून  मार्गदर्शन करताना म्हणाले की, जीवनात गुरू हेच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात. त्यांनी केलेल्या शिक्षा, त्यांचे कडक शब्दांत खडसावने हेच जीवनाला पैलू पडतात. म्हणून गुरू शिष्य यांची परंपरा ही आदर्श जीवनाची शैली आहे. शिक्षण घेण्यासाठी सर्व श्रेष्ठ माध्यम म्हणजे मातृभाषा हेच आहे.


यावेळी १२ वी कला शाखेचे गुणवंत विद्यार्थी श्रद्धा पाटोळे, अर्पिता तोडमल, वृषाली साळवे, सुफियान शेख, ऋतुजा येवले, सुनिता निकम या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

 विदयालयाचे मुख्याध्यापक अरूण तुपविहिरे यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या विद्यालयात सर्वांगीण विकासासाठी राबविले जाणारे उपक्रम व भावी उदिष्ट्ये विशष केले. हे साध्य होण्याकरीता संस्थेचे सचिव डॉ. महानंद माने यांचे भरीव सहकार्य, प्रेरणादायी मार्गदर्शन सतत लाभत आहे.


यावेळी जितेंद्र मेटकर, क्रीडा शिक्षक घनशाम सानप, सुरेखा टेमकर, संदीप जाधव, अनघा सासवडकर इत्यादी अध्यापक उपस्थित होते. सुत्रसंचलन संतोष जाधव यांनी केले तर आभार उप मुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे यांनी मानले.