विद्युत मोटारी जळाल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत
मुख्याधिकार्यांचे दुर्लक्ष, शहराला कोणी वाली आहे का? - दादापाटील सोनवणे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहराला पाणी पुरवठा करणार्या मुळा धरणावरील तीन विद्युत मोटारी जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा गेली १५ दिवसांपासून विस्कळीत झाला असून नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नव्याने दाखल झालेले मुख्याधिकारी यांना विषयाचे गांभीर्य नसून हारतुरे स्विकारण्यात मग्न आहेत. शहराला कोणी वाली राहिला नसून मुख्याधिकार्यांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते दादापाटील सोनवणे व विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केले.
राहुरी शहराला पाणीपुरवठा करणार्या ५०, ५२ व ३३ हॉर्स पॉवरच्या विद्युत मोटारी जळाल्यामुळे राहुरी शहरातील वार्ड क्र.६ मधील पाणीपुरवठा गेल्या १५ दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता मुळा धरणातील विद्युत मोटारी जळाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती घेतली असता सदरील मोटारी दुरूस्ती करणार्या व्यक्तीचे मागील बीलच नगरपालिकेने अदा केले नसल्याने मोटार दुरूस्तीसाठी कोणीही तयार होत नसल्याचे समजले. तसेच शहरातील काही भागातील पाणी पुरवठा सुरळीत असून केवळ विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातीलच पाणी पुरवठ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. नगरपालिका प्रशासनाकडून दुजाभावाची वागणूक दिली जात आहे.
ज्या भागात १००% पाणीपट्टी भरली जाते. त्या भागात विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र ५०% पेक्षाही कमी असलेल्या वसुलीच्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत होत असल्याने या बाबत नागरीकांमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे. दादापाटील सोनवणे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रभाग क्र. ६ मध्ये २ टँकरद्वारे नागरीकांना पाणीपुरवठा करून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
शहरातील अनेक रोडमधील गटारीवरील चेंबर्स फुटल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून या फुटलेल्या चेंबर्समुळे अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. रस्त्यावरील कचरा वेळोवळी उचलला जात नाही. तसेच या परिसरातील शुक्लेश्वर चौक, स्वस्तिक चौक, सरकारी दवाखान्यासमोरील, विद्यामंदिर प्रशालेजवळीली तसेच नवीपेठमध्ये असणार्या सार्वजनिक शौचालय व मुतार्यांची वेळोवळी साफ केले जात नसल्याने परिसरात मोठी दुर्गंधी निर्माण होऊन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नागरी सुविधांकडे पालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने नागरीकांना कोणीही वाली राहिला नसल्याची प्रतिक्रिया नागरीकांमधून येत आहे.
राहुरी शहरात नव्याने दाखल झालेल्या मुख्याधिकार्यांनी शहराचा पाणीपुरवठा, स्वच्छता आदी मुलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असून शहराचा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात येणार असल्याचे माजी विरोधी पक्षनेते दादापाटील सोनवणे व विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी सांगितले.
