पोलिस पथकाने रोड रोमीयोंची धरपकड करत यथेच्छ धुलाई करून कारवाई केली.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरातील मुलींच्या शाळेजवळ टवाळकी करणाऱ्या रोड रोमीयोंची पोलीस पथकाने काल दिनांक ११ जुलै रोजी धरपकड करत धुलाई करून ताब्यात घेतले आणि कारवाई केली. या घटनेमुळे टवाळखोर तरूणांमध्ये चांगलीच धावपळ उडाली होती.
गेल्या काही दिवसापासून राहुरी शहरातील विद्यामंदिर शाळा, भागीरथीबाई शाळा तसेच राहुरी कॉलेज आदि ठिकाणी टवाळखोर रोड रोमीयो शाळा भरतेवेळी व सुटतेवेळी शाळा परिसरात गर्दी करून टवाळकी करीत होते. यामुळे शालेय व महाविद्यालयीन मुलींना शाळेत येताना व जाताना या रोड रोमीयोंचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत होती.
काल दिनांक ११ जुलै रोजी सकाळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील पोलिस नाईक सचिन ताजणे, नदिम शेख, भाऊसाहेब शिरसाट, प्रमोद ढाकणे, प्रवीण आहिरे, आदि पोलीस पथकाने राहुरी कॉलेज व भागीरथीबाई शाळा परिसरात साध्या वेशात जाऊन टवाळकी करणाऱ्या रोड रोमीयोंची धरपकड करत आठ ते दहा तरुणांना ताब्यात घेतले.
त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची यथेच्छ धुलाई करत प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिस पथकाने आज शहरात रोड रोमीयोंवर केलेल्या कारवाईमुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
