Type Here to Get Search Results !

राहुरी - आप्पासाहेब तात्याबा म्हसे या शेतकर्‍याचा विहिरीत पडून मृत्यू.

 आप्पासाहेब तात्याबा म्हसे या शेतकर्‍याचा विहिरीत पडून मृत्यू.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील आप्पासाहेब तात्याबा म्हसे (वय 66 वर्षे) या शेतकर्‍याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. 9 ऑगस्ट रोजी घडली आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी, आप्पासाहेब म्हसे मंगळवार दि. 8 ऑगस्ट रोजी रात्री आठ ते नऊ च्या सुमारास नेहमी प्रमाणे गावाजवळच असणार्‍या शेतातील विहिरी जवळील जनावरांच्या गोठ्याकडे गेले होते. त्यांच्या शेतातच जनावरांचा गोठा असल्याने ते नेहमीच रात्री तेथे राखणास जात असत.


 दुसर्‍या दिवशी ते नेहमी प्रमाणे जनावरांचे काम आटोपून घरी न आल्याने त्यांच्या घरातील माणसांनी गोठ्यावर जाऊन पाहिले असता त्यांना तेथे ते दिसून आले नाही. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शेतात व इतरत्र शोध घेतला असता ते मिळून आले नाही. अनेक नातेवाईकांकडे चौकशी करूनही त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने जवळच असलेल्या विहिरी काहींनी डोकावून पाहिले असता चपला पाण्यात तरंगता दिसल्याने त्यांचा विहिरीत शोध सुरू झाला.


 त्यानंतर गावातील काही तरूणांनी विहीरीत पाणी जास्त असल्याने पाण्यात गळ सोडून त्यांचा शोध घेत असताना गळ त्यांच्या अंगातील कपड्यांना अडकल्याने त्यांना पाण्यातून वर काढले. तात्काळ रूग्णवाहिकेतून राहुरीच्या ग्रामिण रूग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच ते मयत झाल्याचे तेथील वैद्यकिय आधिकार्‍यांनी घोषीत केले.


 वैद्यकिय आधिकार्‍यांच्या खबरीनुसार राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे. दरम्यान गोठ्या जवळच कठडे नसलेली विहिर असल्याने आंधारात त्यांना अंदाज न आल्याने त्यांचा पाय घसरून विहिरी पडले असल्याची नातेवाईकांनी शंका व्यक्त केली. 


आप्पासाहेब म्हसे यांच्या पश्‍चात दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. ते कोंढवड येथील किराणा व्यावसायिक अनिल म्हसे यांचे वडील होते.