शिवपुत्र संभाजी महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात
१ मार्च रोजी शुभारंभ
आ. नीलेश लंके यांच्याकडून तयारीचा आढावा
नगर : प्रतिनिधी
आ. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने नगरच्या नेमाणे इस्टेट येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आ. नीलेश लंके यांनी या तयारीचा बुधवारी आढावा घेतला.
दि. १ ते ४ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महानाटयासाठी दररोज साठ हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून नगर दक्षिण मतदारसंघातील विविध तालुक्यांसाठी व नगर शहरासाठी वेगवेगळया दिवशी आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण नगर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये महानाटयाच्या प्रवेशिका पोहचविण्यात आल्या असून आ. लंके यांची यंत्रणा रात्रंदिवस नियोजनासाठी झटत आहे.
खा. डॉ. अमोल कोल्हे हे या महानाटयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भुमिका करणार असून १ ते ४ मार्च दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता महानाटयाच्या प्रयोगास सुरूवात होेणार आहे. दोन तास ४० मिनिटांचे हे ऐतिहासिक महानाटय आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह ज्येष्ठ कलाकार राजन बाने हे औरंगजेबाची भुमिका साकारणार आहेत तर स्नेहलता वसईकर, महेश कोकाटे, विश्वजीत फडते, अजय तापकीरे, रमेश कोरडे हे सिनेकलाकारही महानाटयामध्ये वेगवेगळया भुमिका साकारणार आहेत. दिडशेहून अधिक स्थानिक कलाकारांनाही या महानाटयामध्ये संधी देण्यात आली आहे.
जगदंब क्रिएशन व महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शनच्या स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या या ऐतिहासिक महानाटयाचे लेखक आणि दिग्दर्शक महेंद्र वसंतराव महाडीक हे आहेत.
