दोघा पती पत्नीने महिलेला मारहाण करुन एक तोळ्याचे मनी मंगळसुत्र काढून नेले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
रस्त्याने जात असलेल्या एका महिलेला दोघा पती पत्नीने मारहाण करुन महिलेच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे मनी मंगळसुत्र काढून नेल्याची घटना दि. १ जून २०२४ रोजी राहुरी तालूक्यातील कुरणवाडी येथे घडलीय.
लताबाई विठ्ठल खिलारी, वय ५० वर्षे, रा. कुरणवाडी, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या कुरणवाडी येथील शेत जमीनीतील सामाईक रस्त्याबाबत राहुरी तहसील कार्यालयात प्रकरण प्रलंबित आहे.
दि. १ जून २०२४ रोजी सकाळी ९ वा. चे सुमारास लताबाई खिलारी या शेतातून कडवळाचे ओझे घेऊन रस्त्याने घरी येत होत्या. त्यावेळी समोरून बाळासाहेब डव्हाण हा तेथे आला व म्हणाला की तुम्ही या रस्त्याने का जाता. त्यावेळी लताबाई खिलारी त्याला म्हणाल्या कि, हा सार्वजनिक रस्ता आहे. हा कोणाचा एकट्याचा रस्ता नाही.
असे म्हणाल्याचा राग आल्याने त्याने व त्याची पत्नी वंदना डव्हाण या दोघांनी लताबाई खिलारी यांना शिविगाळी करून लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच बाळासाहेब डव्हाण याने लताबाई यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र हे तोडून घेतले.
त्यानंतर वंदना डव्हाण ही म्हणाली कि, माझ्या भावाला सांगून तुमच्या कुटुंबाला पिस्तुलाने जीवे ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली. घटनेनंतर लताबाई विठ्ठल खिलारी यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्या फिर्यादीवरून आरोपी बाळासाहेब सावळेराम डव्हाण व वंदना बाळासाहेब डव्हाण, रा. कुरणवाडी, ता. राहुरी. यांच्यावर गून्हा रजि. नं. ६५७/२०२४ भादंवि कलम ३२३, ३२७, ५०४, ५०६ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आलाय.
