आ. तनपुरेंच्या जनता दरबारात अनेक प्रश्नांचा जागेवर निपटारा.
जनसामन्यांच्या कामांबाबत तक्रारी आल्यास हयगय करणार नाही- आ. तनपुरे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी, नगर व पाथर्डी मतदार संघातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या संपर्क कार्यालयात जनता दरबार घेण्यात आला. यावेळी आमदार प्राजक्त तनपूरे यांनी मतदार संघातील नागरीकांशी आपुलकीने चर्चा करून आलेल्या प्रत्येक नागरीकाची समस्या जाणून घेतली. आणि अधिकार्यांशी संवाद साधत प्रश्नावर जागीच तोडगा काढला. तसेच सर्व सामान्य नागरिकांची अडवणूक करु नये. नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड ईशारा तनपूरे यांनी दिला.
मतदार संघातील सर्व सामान्य नागरीकांच्या अडचणी व समस्या दूर करण्यासाठी आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या राहुरी शहरातील संपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदार संघातील शेकडो नागरिक आपल्या समस्या घेऊन जनता दरबारात उपस्थित राहिले. आलेल्या प्रत्येक नागरिकाशी आमदार तनपूरे यांनी चर्चा केली.
यामध्ये राहुरी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांसह पोलिस, महसूल, महावितरण, वन विभागाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या. जनता दरबारात शासकीय, सामाजिक तसेच खाजगी तक्रारी घेऊन आलेल्या नागरीकांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यावर आमदार तनपूरे यांनी अधिक भर दिला. त्यांनी शासनाच्या अधिकार्यांशी संवाद साधत तात्काळ सर्व सामान्यांची कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी महिलांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर होती. यापूर्वीही आ. तनपुरे यांनी अनेक वेळा राहुरीमध्ये वेळोवेळी जनता दरबार घेत नागरीकांच्या समस्या सोडविल्या आहेत. जनता दरबारात आ. तनपुरे हे प्रत्यक्ष संवाद साधत असल्याने अनेकांनी मोकळ्या मनाने आपल्या भावना व्यक्त केल्या. शासकीय शाळांसह खाजगी शाळांच्या प्रवेशाच्या अडचणी, तसेच प्रवेश मिळावे म्हणून कागदपत्र तात्काळ मिळावे. यासाठी अनेकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यावर आ. तनपुरे यांनी महसूल प्रशासन तसेच शालेय विभागाशी संपर्क साधत प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणावरही अन्याय होऊ नये, अतिरिक्त प्रवेश शुल्क न घेता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचण येऊ नये, म्हणून उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी शेती विषयक अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. कृषी विभागाने बीयाणे, खते विक्री बाबत लक्ष देण्याच्या सूचना देत शेतकर्यांच्या समस्या सोडविण्याचे आदेश आ. तनपुरे यांनी दिले. वीज, पाणी, रस्ते, शेतरस्ते, रेशन, खावटी, शासकीय अनुदान असे अनेक प्रश्नांबाबत समस्या मांडताच आ. तनपुरे यांच्याकडून संबंधित प्रशासनाशी संपर्क साधत प्रत्येक प्रश्नाचा जागेवरच तोडगा निघत असल्याने आ. तनपुरेंच्या जनता दरबारामध्ये समस्या घेऊन आलेल्या प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद दिसून आला.


