रस्त्याचे काम करा, अन्यथा आंदोलन- सीमा नवले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी ते पांढरीपूल या रस्त्यावर जागोजागी पडले आहेत. सदर खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. या रस्त्याचे मजबुतीकरणचे काम तातडीने हाती घ्यावे. अन्यथा या भागातील गावकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा गुंजाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा दिपक नवले यांनी निवेदनाद्वारे दिला.
रस्त्याच्या दुरावस्थे बाबत राहुरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सरपंच सीमा नवले यांनी म्हटले की, वांबोरी पांढरीपूल हा नगर तसेच छत्रपती संभाजीनगर मार्गाला जावून मिळणारा पर्यायी रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे.
वांबोरी ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने कांदा व इतर शेतीमाल खरेदीसाठी महाराष्ट्रासह पर राज्यातील खरेदीदारांची मालवाहतूक याच मार्गाने सुरू आहे. वांबोरी ते गुंजाळे या मार्गावरील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन धारकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.
शाळकरी मुलांचा देखील हाच मार्ग असल्याने वांबोरी ते पांढरीपूल रस्त्याचे मजबुतीकरण काम तातडीने हाती घेणे आवश्यक बनले आहे. १ ऑगस्ट २०२४ पर्यंत या रस्त्याचे काम मार्गी लावावे. अन्यथा गुंजाळे येथील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सरपंच सीमा नवले यांनी दिला.
