बिबट बछडा अडकला पोल्ट्रीच्या जाळीत
निरगुडसर ता.आंबेगाव येथील चोळीचा मळा येथे शरद गजाभाऊ वळसे पाटील यांच्या घराजवळील कोंबड्यांच्या पोल्ट्ट्रीचे समोर मोकळ्या बंदिस्त जाळीत बिबट बछडा अडकल्याची घटना दिनांक २४ रोजी सकाळी उघडकीस आली.
निरगुडकर चोळीचामळा येथे शेतकरी शरद गजाभाऊ वळसे हे राहत असून सकाळी ते त्यांच्या पोल्ट्रीतून आवाज येत असल्याने ते पोल्ट्री जवळ गेले असता त्यांना बंदिस्त पोल्ट्री च्या बाहेर च्या बाजूने केलेल्या जाळीच्या आवारात बिबट बछडा अडकल्याचा दिसला. याबाबत त्यांनी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांना माहिती दिली यावेळी वनविभागाचे अधिकारी कासारे भाऊसाहेब, रेस्कु टीम सदस्य यांनी घटनास्थळी भेट देत बिबट्याला जाळीच्या एका बाजूने रस्ता करून त्याची सुटका केली. सदर बिबट बछडा हा नर जातीचा असून शिकारीच्या शोधात रात्रीच्या वेळी पोल्ट्रीच्या आवारात घुसला असावा व बाहेर येण्याची साधन नसल्याने तो पोल्ट्रीत अडकून पडला होता. बाहेर येण्यासाठी तो धडपड करत होता व जाळीला धडका देत होता. सदर बछड्याची मादी जवळपासच्याच परिसरात असल्याची शक्यता असल्याने बछड्याला जाळीतून मुक्त करणे गरजेचे असल्याने वनविभागाचे अधिकारी, रेस्क्यू टीम सदस्य जाळीतुन रस्ता करत बिबट बछड्याची मुक्तता केली. या अगोदरही या परीसरात बिबट्याचे वारंवार दर्शन झाले असून वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. या परीसरात पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

